ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बांधकाम कामगार कल्याण मंडळ म्हणजे न आटणारा समुद्र : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन          कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात 

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

बांधकाम कामगारांच्या आयुष्याचे कोटकल्याण करण्याची क्षमता इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आहे. हे मंडळ म्हणजे बांधकाम कामगारांसाठी न आटणारा समुद्र आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
     
कागल शहरातील छत्रपती संभाजीराजे उद्यान परिसरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. युवा कार्यकर्ते अशोक वड्ड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
       
भाषणात मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, कागल शहरातील गोरगरीब बेघर आणि झोपडपट्टी धारकांसाठी एक हजार घरकुलांचा प्रकल्प पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प राज्यातच नव्हे तर देशातसुद्धा लौकिकास्पद आहे. लवकरच डायटसमोरच्या जागेत तीन हजार घरकुलांचा प्रकल्प मंजूर करून तो पूर्णत्वाला नेऊ. गरीब निराधार पेन्शन लाभार्थ्यांसाठी असलेली २१ हजार उत्पन्न मर्यादेची अट ५० हजार करू आणि दरमहा एक हजार रुपये असलेली पेन्शन दरमहा दोन हजारप्रमाणे करू, असेही ते म्हणाले.
   
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कागल शहर सर्वांगसुंदर बनविण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गेल्या दोन वर्षांत तब्बल ५५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत ऑटोमोबाईल हब होण्यासाठी मंत्री मुश्रीफ सातत्याने प्रयत्नशील आहेत, असेही ते म्हणाले.
         
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, गोरगरिबांच्या हक्काचा माणूस अशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख तयार झाली आहे. भाजपच्या पाच वर्षांच्या राजवटीत शहरात केलेले एकतरी उल्लेखनीय काम दाखवा, असेही ते म्हणाले. माजी उपनगराध्यक्ष सुनील कदम यांचेही भाषण झाले.
      
यावेळी व्यासपीठावर रहीम पिंजारी, नवाज मुश्रीफ, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, रणजीत बन्ने,  सौ. आशा मकाकी जगदाळे, सौ. माधवी मोरबाळे, सौ. जयश्री शेवडे, प्रमोद पाटील, सुरेश शेळके, अस्लम मुजावर, संजय सुतार, सागर गुरव, गणेश सोनुले, संग्राम लाड, अर्जुन नाईक, शहानुर पखाली, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
        
स्वागत गंगाराम शेवडे यांनी केले. प्रास्ताविक विनोद पोवार यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार संजय चितारी यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks