मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांनी बोलविली सर्वपक्षीय बैठक; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनची शक्यता

मुंबई ऑनलाईन
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन उपाययोजना आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
राज्यात काल एका दिवसात ३०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ५८ हजार, ९९३ रुग्ण एका दिवसात आढळले होते. हा वेग मोठा असल्याने संभाव्य उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यामुळे सरकार उपाययोजना आखण्यापूर्वी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कालच लॉकडाऊनबाबत मत व्यक्त केले होते. केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊनचा उपयोग नाही. कमीत कमी तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावणे गरजेचे आहे, त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना मी विनंती करणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार दिली होती. त्यामुळे सोमवारपासून लॉकडाऊन लागणार की नाही याबाबत या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.