श्री.सदगुरू बाळूमामा माता सत्यव्वादेवी मंदिरास “ब” वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेतून दोन कोटींचा निधी मंजूर ; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफसाहेब कृतज्ञतापर सत्कार

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मेतके ता. कागल येथील श्री. सद्गगरू बाळूमामा माता सत्यव्वादेवी मंदिर तीर्थस्थळांच्या विकास आणि परिसर सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या “ब” वर्ग तीर्थस्थळ विकास योजनेंतर्गत दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या निधीच्या माध्यमातून येथील मंदिराशेजारी अन्नछत्र, स्त्री व पुरुष भक्तनिवास, विद्युतीकरण, परिसर सुधारणा, संरक्षक भिंती, वाहनतळ, पोहोच रस्ते, स्वच्छतागृहे आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्रप्रदेश येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री. सद्गुरु बाळूमामा माता सत्यवा देवी मंदिराला दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा देता याव्यात, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र योजनेतून भरीव निधी मिळावा, यासाठी आपण ग्रामविकास मंत्री असताना प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. त्यानुसार येथील विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला असून त्याचे मला मनस्वी समाधान आहे.
देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर पाटील म्हणाले, विविध देवदेवतांची शेकडो मंदिर उभारणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांनी बाळूमामा मंदिरासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन खूप मोठं पुण्याईचं कार्य केलं आहे त्यांच्या कार्याचा महिमा पिढ्यानपिढ्या चिरंतन स्मरणात राहील.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोहर पाटील, विठ्ठल पाटील, सल्लागार सदस्य सतीश घोरपडे, सचिव शिवाजी मेथे, सदस्य वसंत भारमल, धनाजी पाटील, रेवन्ना खिलारे, काशिनाथ पाटील, सुरेश बरकाळे, उत्तम चौगुले यांच्यासह भाविक उपस्थित होते.