पांडुरंगा हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर; आम्हाला ते आषाढी वारीनिमित्त तुंबलेलं पंढरपुर पहायचंय’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विठ्ठलाला घातले साकडे

पंढरपूूर :
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी मुख्यमंत्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आले. त्यांच्या हस्ते प्रथम विठ्ठलाची आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची षोडशोपचार पूजा पार पडली. त्यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा तसेच सभामंडप वेगवेiळ्या फुलांनी सजवण्यात आला होता.
दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याचा मान वारकरी प्रतिनिधी म्हणून एका दाम्पत्याला मिळतो. या वर्षी हा मान विठ्ठलभक्त केशव कोलते आणिपत्नी इंदुमती कोलते यांना मिळाला. महापूजा पार पडल्यानंतर कोलते दाम्पत्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उपस्थित असलेल्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.
‘पांडुरंगा हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर. आम्हाला ते आषाढी वारीनिमित्त तुंबलेलं पंढरपूर पहायचंय’, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाला घातलं. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आल्यावर आपण फक्त देवाकडे पाहत असतो, पण मंदिरातील खांब, प्रत्येक दगड काहीना काही बोलत असतो. त्यामुळे मी आज परंपरेचा वृक्ष लावला आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.