चंदगड : मुगळीत बेकायदेशीर रित्या ११२५ घनफूट माती उत्खनन: जिल्हाधिकार्यांच्या मोहिमेस खोडा

चंदगड प्रतिनिधी :
जिल्हाधिकार्यांच्या महसूल लोकजत्रा या अभिनव मोहिमेस मुगळीकराने एका तयार पाणंद रस्त्यावर उत्खनन करुन मोहीमेस खोडा घातला. या प्रकरणी तलाठी साजिदा काझी यांनी पोलीस पाटील संतू रेडेकर व कोतवाल तानाजी भोगण यांचेसह पंचांनी पंचनामा केला. तलाठी काजी यांनी दिले माहितीनुसार ११२५ घनफूट जागेत मातीचे उत्खनन झाल्याचे स्पष्ट होत आहे. सदरची माती कृष्णा बयाप्पा नूलकर याने स्वत:चे घराच्या भरावासाठी वापरल्याचेही आढळून आल्याने बेकायदेशीर माती उत्खननकर्त्यांत खळबळ उडाली आहे. तसा अहवाल चंदगडचे तहसिलदार यांना सादर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येथील मरगुबाई देवस्थानकडे जाणार्या पाणंद रस्त्यावर उत्खनन झाल्याची माहिती काजी यांना मिळताच त्यांनी पथकासमवेत घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस पाटील व कोतवाल यांच्या समक्ष आढळून आलेली वस्तुस्थिती अशी आहे. गट नं १०३ च्या लगत पाणंद रस्त्याचे वर नमूद उत्खनन नूलकरनी केले आहे. अधिक चौकशीअंती या मातीचा वापर नूलकरनी स्वत:च्या खाजगी भरावाकामाकरीता केल्याचेही स्पष्ट झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या या पंचनामा कारवाईने गावात खळबळ उडाली असून संबंधितावर महसूल प्रशासनाकडून होणार्या कारवाईकडे गावकर्यांचे लक्ष लागले आहे. या उत्खनन, पंचनामा वगैरे कारवाईची खुमासदार चर्चा परिसरात सुरु आहे.