शेतीला दिवसा वीज मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज कोल्हापूरात 35 ठिकाणी चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी –
स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी यासाठी आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल अद्याप सरकारने घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी ( 4 मार्च ) राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 35 ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन होणार आहे. दरम्यान, आज राज्यात बारावीची परीक्षा असल्याने 11 वाजल्यानंतर रास्ता रोको करण्यात यावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात या ठिकाणी होणार चक्काजाम आंदोलन…..
चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा – पाटणे फाटा, अडकूर, शिनोळी, नेसरी, भडगाव , गडहिंग्लज मार्केट यार्ड, कडगाव, झुलपेवाडी फाटा आणि आजरा
कागल तालुका- कागल, सिद्धनेर्ली, कापशी, मुरगुड
हातकणंगले तालुका- हुपरी, हातकणंगले, कबनूर, वाठार
राधानगरी तालुका- राधानगरी, आमजाई व्हरवडे, मुदाळतिट्टा, म्हासुर्ली
करवीर तालुका- सांगरूळ फाटा, भोगावती, आंबेवाडी, सांगवडे फाटा
पन्हाळा तालुका- कोतोली फाटा, बोरपाडळे फाटा
शाहुवाडी तालुका- बांबवडे, मलकापूर
शिरोळ तालुका- चौंडेश्वरी चौक, अंकली टोलनाका, कुरुंदवाड, शिरदवाड आणि गणेश वाडी या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे.
..तर विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन
मागील 10 दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याचा निर्णय झाला नाही तर 4 मार्च पासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. यापूर्वी दोन मंत्री , दोन आमदारांनी आंदोलनाला यांनी भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता. ऊर्जा मंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता.