ब्रेकिंग ! 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा स्थगित

टीम ऑनलाईन :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) वाढत्या कोरोना संसर्गामुळे 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा स्थगित केली आहे. मागील महिन्यातच एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी 4 लाख उमेदवार बसले होते. राज्यात कोरोनाची परिस्थिती असल्याने अनेक दिवसांपासून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात होती.
सर्वच स्तरातून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात असल्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी तातडीची ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एमपीएससी परीक्षा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, अद्याप नव्या तारखेसाठी कोणताही निर्णय झालेला नाही. नवीन तारीख नंतर कळविण्यात येईल