भाजप आणि पवारांमध्ये जवळीक वाढली; शहांनंतर आता नारायण राणेंची पवारांसोबत भेट

मुंबई :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सकाळी १० वाजताच्या सुमारास माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी थेट रुग्णालय गाठून पवारांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते.
पक्ष वेगवेगळे असले, वैचारिक भूमिका भिन्न असल्या, तरी एखाद्या राजकीय नेत्याच्या आजारपणात त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पाहायला मिळते. कोणे एकेकाळी आघाडीमध्ये शरद पवारांसोबत राहिलेले नारायण राणे हीच संस्कृती जपताना दिसत आहेत. त्यामुळेच पवारांच्या शस्त्रक्रियेनंतर राणेंनी सहकुटुंब जाऊन त्यांची विचारपूस केली.शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश बड्या राजकारण्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि भाजपचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या गुप्त भेटीची चर्चा सध्या सुरू आहे.
ही भेट नेमकी कशासाठी झाली यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे जुळतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. आणि अशातच राणेंनी शरद पवारांची आवर्जून भेट घेतल्याने पवार आणि भाजपमधील असलेला दुरावा कमी होऊन जवळीक वाढत असल्याचे बोलले जात आहे.