आमदार रोहित पवार यांनी केल ट्रॅफिक पोलीसांचे कौतुक.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
वाहतूक पोलीस नेहमीच दंडाची पावती फाडतात, असा तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे. दररोज शेकडो लोकांना तोंड देणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून अचानक तुम्हाला कौतुकाचीही पावती मिळू शकते. मलाही काल असाच अनुभव आला.
वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांची काल पुण्यात एका ठिकाणी भेट झाली. यावेळी सोबत फोटो काढायची इच्छा त्यांनी व्यक्त केल्याने आम्ही फोटो काढला. त्यातील एका कर्मचाऱ्याने मे 2019 मध्ये माझ्या गाडीवर दंड आकारला होता. ती घटना मी विसरूनही गेलो होतो, पण त्या कर्मचाऱ्याने त्या घटनेची आठवण काढली आणि तुम्ही आमदार नसताना तेंव्हाचा स्वभाव आणि आताचा स्वभाव यात काहीच फरक नसल्याचं सांगत दंडाची नाही तर चांगल्या वर्तणुकीची पावती दिली. वाहतूक पोलिसाकडून मिळालेलं हे ‘प्रमाणपत्र’ पाहून मलाही सुखद धक्का बसला.
ऊन, थंडी, पाऊस याची कोणतीही पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी 12-12 तास रस्त्यावर उभं राहून कर्तव्य बजावणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत मला नेहमीच आदर वाटत आला आहे. नागरिकांनीही हुज्जत न घालता या कर्मचाऱ्यांना नेहमी सहकार्य करावं, असं माझं आवाहन आहे.