‘ विकेंड लॉकडाऊन ‘ ला बिद्री परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

बिद्री ( प्रतिनिधी अक्षय घोडके ) :
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारान घेऊन शासनाने पुकारलेल्या ‘ विकेंड लॉकडाऊनला ‘ बिद्रीसह परिसरातील गावांमध्ये पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी रात्री आठनंतर सुरु झालेल्या या मिनी लॉकडाऊनला व्यापारी, विक्रेते, किरकोळ दुकानदार, प्रवासी, कामगार या सर्वांनीच आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून पाठींबा व्यक्त केला.
अन्य जिल्ह्यांप्रमाणेच कोल्हापूर जिल्हयातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने आठवडयातील दर शनिवार, रविवार विकेंड लॉकडाऊन पुकारला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. मुरगूड पोलिसांनी मागील चार दिवसांपासून बिद्री परिसरातील गावांमध्ये या लॉकडाऊनविषयी जनजागृती करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत बिद्रीसह, बोरवडे, सोनाळी, वाळवे खुर्द, मुधाळ तिट्टा, उंदरवाडी, फराकटेवाडी, सरवडे, मालवे आदी गावात व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त पाठींबा दिला. आज सकाळपासूनच या गावांतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. प्रवाशांनी नेहमी गजबजलेल्या कोल्हापूर – गारगोटी या राज्यमार्गावरही यामुळे सामसूम होती. बिद्री बसस्थानक परिसरातील सर्व दुकाने बंद असल्याने सर्वत्र शांतता होती.
दरम्यान मुरगूड पोलिसांच्यावतीने बिद्री परिसरातील गावांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. नागरिकांनीही आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवत स्वंयस्फूर्तीने नियम पाळत लॉकडाऊनला पाठींबा व्यक्त केला.

१ ) विकेंड लॉकडाऊन असल्याने कोल्हापूर – गारगोटी या राज्यमार्गावर सामसूम होती.
२ ) बिद्री परिसर व्यापारी असोसिएशनने दुकाने बंद ठेवत लॉकडाऊनला सहकार्य केले.