बिद्री येथे चार दिवसांत कोरोनाने बाप-लेकाचा बळी!

बिद्री : प्रतिनिधी
बिद्री (ता. कागल) येथील बिद्री कारखान्याचे निवृत्त कर्मचारी भीमराव दौलू परीट (वय ६४) यांचे कोरोनाने रविवारी निधन झाले तर त्यांचा कोरोनाबाधित मुलगा चंद्रकांत भीमराव परीट (वय ३८) यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. चार भिमराव परीट चंद्रकांत परीट दिवसांच्या अंतराने घरातील कर्त्या बाप लेकाच्या अकाली निधनाने परीट कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. परीट कुटुंबातील चार जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या पत्नी आणि मोठ्या मुलाने दवाखान्यात उपचार घेत कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत; परंतु भीमराव आणि त्यांचा लहान मुलगा चंद्रकांत यांची तब्येत अधिकच बिघडल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; पण अखेर या दोघांचा मृत्यू झाला. भीमराव परीट यांनी मौनीनगर कामगार पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. चंद्रकांत परीट हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांचा मित्रपरिवार ही मोठा आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पिता-पुत्रांच्या अकाली झालेल्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.