बेळगाव : उद्या बेळगाव बंदची हाक; महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींळर शाई फेकली

बेळगाव प्रतिनिधी :
अधिवेशनाला विरोध करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर सोमवारी कन्नडीगांनी काळी शाई फेकत अगोचरपणा केला. त्यामुळे जनक्षोभ उसळला असून, मराठी भाषकांमध्ये याविरोधात तीव्र संताप आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावमध्ये मराठी लोकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा प्रश्न पेटणार आहे.
कर्नाटक विधानसभेचे आज बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होत आहे. मात्र, या अधिवेशनाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिताच विरोध आहे. या अधिवेशनाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सकाळपासून हा महामेळावा हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. पोलिसांकडूनही तसा दबाव आणला जात होता. त्यामुळे घटनास्थळीही तणाव होता. अशावेळी अचानक कन्नड संघटनेच्या दोघांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगाप्रश्न पेटला आहे. पोलिसांच्या समोर दळवी यांच्यावर हल्ला झाला. त्यामुळे हल्ला होत असताना पोलीस काय करत होते, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.