आदमापुर येथे ५ ते १३ एप्रिल अखेर होणारा बाळु मामा भंडारा उत्सव रद्द ; देवस्थान समिती,ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

मुदाळतिट्टा प्रतिनिधी : प्रकाश पाटील
महाराष्ट्र ,गोवा, आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील सद्गुरू बाळू मामां चा ५ ते १३ एप्रिल अखेर होणारा वार्षिक भंडारा उत्सव यात्रा वाढत असलेल्या कोरोनाच्या फैलावामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती भुदरगड चे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
यासंदर्भात आदमापूर येथील बाळूमामा देवालयात बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले होते. यावेळी कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम व सरपंच विजयराव गुरव प्रमुख उपस्थित होते.
बैठकीचा हेतू व्यवस्थापक अशोक पाटील यांनी सांगितला. यात्रा कालावधीत होणारे भजन, प्रवचन, कीर्तन, हरिजागर, रोजची आरती, जागर, पालखी सोहळा, महाप्रसाद, आंबील प्रसाद या सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.
तसेच आमावस्या व गुढीपाडवा यात्रा ही रद्द केली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचा पुढील आदेश येईपर्यंत येथील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.या निर्णयाची भाविकांनी नोंद घेऊन बाळूमामा देवस्थान समिती व ग्रामस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी केले. यावेळी धैर्यशील भोसले, प्रा.एस.पी.पाटील, सुधीर पाटील, नामदेव पाटील, प्रा.शिवाजी खतकर यांनी मनोगत व्यक्त केली. , पोलिसपाटील माधुरी पाटील, गुंडोपंत पाटील, विकास पाटील उपस्थित होते. स्वागत शंकरराव कुदळे यांनी केली. आभार सरपंच विजयराव गुरव यांनी मानले.