बिद्रीतील वृत्तपत्र विक्रेते बाळासाहेब सावरतकर यांचे निधन

बिद्री प्रतिनिधी :
येथील प्रसिद्ध वृत्तपत्र विक्रेते व बी.एल. सावरतकर एजन्सीचे मालक बाळासाहेब लक्ष्मण सावरतकर ( रा. बोरवडे ) यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या ४३ वर्षापासून ते बिद्री परिसरात वृत्तपत्र विक्री करत होते.
अल्पभूधारक शेतकऱ्याच्या सामान्य कुटूंबात जन्माला आलेल्या श्री.सावरतकर यांनी १९७८ साली बिद्री साखर कारखाना साईटवर एका छोट्याशा लाकडी खोक्यात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सुरवातीला बिद्री, बोरवडे, कसबा वाळवे, कासारवाडा,, तिटवे, शेळेवाडी,तुरंबे, सोनाळी, मळगे आदी परिसरातील पंधरा गावात ते सायकलवरुन वृत्तपत्र वितरणाचे काम करायचे. मागील ४३ वर्षे त्यांनी अखंडपणे वितरणाचे काम केले.
वृत्तपत्र वितरणातून त्यांचा जिल्हाभर आदर्श प्रतिनिधी म्हणून परिचय होता. कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र वितरण संघटनेचे ते ज्येष्ठ सदस्य होते. वारकरी संप्रदायाची आवड असणाऱ्या श्री. सावरतकर यांचा बिद्री परिसरात मोठा मित्रपरिवार होता. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांचे राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार ( दि. ९ ) रोजी सकाळी ९ वाजता बोरवडे येथे होणार आहे.