राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्याची तयारी करा : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई ऑनलाईन :
राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनसारखे निर्बंध लावण्याची तयारी करा, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आज टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबात चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळावेच लागतील अशी सूचना केली. जर असे नियम पाळले जात नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशी सूचना केली.
यावेळी ठाकरे म्हणाले, ‘एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरू राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेकजण ही गोष्ट अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. विवाह समारंभांतही नियम पाळले जात नाहीत. बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. वारंवार सांगूनही त्याचे पालन होत नाही. लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल. त्यामुळे धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करावे.
ऑक्सिजन पुरवठा, खाटांचे प्रमाण वाढवा
आरोग्य सुविधांबाबात मुख्यमंत्री म्हणाले, ‘गेल्या वर्षी सरकारने टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य सुविधा वाढवल्या, तात्पुरती रुग्णालये उभारली पण दुसऱ्या लाटेत या सुविधा कमी पडतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील तसेच ऑक्सिजन उत्पादन ८० टक्के वैद्यकीय व २० टक्के इतर कारणांसाठी राखीव ठेवा. रुग्णालयांतील खाटांच्या बाबतीत ८०:२० प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही व रुग्णांची गैरसोय होणार नाही हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाउले उचलावीत, असेही ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रात सुविधा हव्यात
कोरोनापेक्षा देखील आपली चाचणी पॉझिटिव्ह आली तर कुठल्याही विलगीकरण केंद्रात नेऊन टाकले जाईल व आपल्याला तिथे सुविधा मिळणार नाहीत, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुविधा नसतील तर नजीकच्या शहरातील किंवा परिसरातील सुविधा मिळावी अशी व्यवस्था करा, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. केवळ मुंबई-पुणे यावर लक्ष केंद्रित न करता राज्याच्या सर्व भागात विलगीकरण सुविधा तसेच आरोग्य सुविधा कमी पडणार नाहीत हे कटाक्षाने पाळले पाहिजे.