जीवनमंत्रताज्या बातम्या

‘अर्जुनाचे एकलव्यायन’ : अंतःकरणाला भिडणारे सिंहावलोकन

 

शब्दांकन  :  प्रा.डाॅ.आनंद वारके
मराठी विभाग
दूधसाखर महाविद्यालय,बिद्री
ता.कागल,जि.कोल्हापूर.

‘अर्जुनाचे एकलव्यायन’ मधील अंतरंगाची बरीच उत्सुकता होती.वाचताना एक गंमत झाली. पुस्तक हातात आले त्या दिवशी सहज चाळायला म्हणून गेलो.पुस्तकाच्या मधील एका पानावर थांबून बी.ए.बी.एड. च्या द्वितीय वर्षातील कोणते अनुभव कुंभार सरांनी सांगितले आहे ते पाहू म्हणून वाचायला सुरुवात केली.पण वाचन काय थांबविता येईना. मग मधूनच पुस्तक वाचून संपविले. नंतर सुरवातीचा भाग वाचला. सांगण्याचा मुद्दा असा की पुस्तक चाळण्याच्या प्रयत्नातच पुस्तकातील अनुभवांनी मनाची पक्कड कधी घेतली कळलंच नाही.समजले तेव्हा ठरविले की आता राहिलेले पुस्तक वाचून पूर्ण संपवायचे. नंतर सुरुवातीपासून वाचायचे. चित्रपट पाहताना सुरुवात चुकलेल्या प्रेक्षकाच्या मनाची पकड सिनेमातील एखाद्या प्रसंगाने घ्यावी आणि तो सिनेमात रमून जावा अशी काहीशी अवस्था झाली.

असे होण्यामागे काही कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे या पुस्तकातील प्रवाही भाषा.भाषेचा हा प्रवाहीपणा कुठेही खंडित होत नाही.जरी त्यांनी काही मराठी विधानात इंग्रजी शब्द मध्ये मध्ये टाकले असले तरी.एक सिध्दहस्त इंग्रजीचा प्राध्यापक आपले जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी अशी जिवंत, रसरशीत मराठी भाषा वापरु शकतो याचे नवल वाटते.अशा भाषेच्या वापरामुळेच त्यांच्या जीवनानुभव अभिव्यक्तीलाही एक गोडी प्राप्त झाली आहे. ही भाषा काही वेळेला आलंकारिक बनते.काही वेळेला चिमटे घेणारी मिस्कील बनते.काही ठिकाणी ही भाषा उपहासगर्भ आहे.तर कधी काव्यात्म रुप घेते.इंग्रजी भाषेला आयुष्य वाहिलेल्या एका प्राचार्यांनी आपल्या आत्मकथनात मराठी भाषा अशा सहज पध्दतीने योजली आहे की इंग्रजी इतकेच त्यांचे मराठी भाषेवरील प्रभुत्वही सिध्द होते.आपले अनुभव विश्व त्यांनी स्वत:च्या बोलीत सांगितल्यामुळे या आत्मकथनातील अनुभवांना समृद्धता प्राप्त झाली आहे.आत्मकथनला हवी असणारी स्पष्ट व रोखठोक भाषा हे या आत्मकथनाचे वैशिष्ट्यं आहे.या आत्मकथनाच्या भाषेतील प्रवाहीपणा वाचक मनाची पकड घेणारा आहे.

‘अर्जुनाचे एकलव्यायन’ समजून घेताना आत्मचरित्रकार ज्या काळात जन्मले तो काळ,ते ज्या गावात राहात होते त्या गावाची पार्श्वभूमी,त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती,ते जेथे जेथे गेले ती ठिकाणे,त्यांच्या जीवनात आलेल्या व्यक्ती या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतील.

ते ज्या काळात जन्मले त्या काळात शाळा मंदिरात भरविल्या जात होत्या. साधारणतः मंदिरातील शाळा नुकत्याच जि.प.च्या नव्या इमारतीत यायला लागल्या होत्या.शाळा म्हणजे मुलांच्या मनात धडकी.अशी सर्व मुलांची अवस्था होती.शाळा शब्द उच्चारताच काही मुलांची गाळण उडायची.काही मुलं शाळा शब्द उच्चारताच फाळ फाळ मुतायची.शाळेतील मुलांच्या उपस्थितीसाठी उचल तांगडी नावाचा प्रकार अस्तित्वात आला होता.मुलांना शाळेत अोढून आणले जायचे. ही परिस्थिती लक्षात घेतली तर अर्जुन कुंभार यांनी या पुस्तकाला दिलेल्या एकलव्यायन या शीर्षकाची यथार्तता लक्षात येईल.

हे आत्मकथन वाचल्यावर
आत्मचरित्र लेखनासाठी स्मृती किती तल्लक असावी लागते हे लक्षात येते. तशी ती अर्जुन कुंभार यांच्याकडे असल्याचे दिसते. आपल्या दारिद्र्याचे वर्णन करण्यापेक्षा इंग्रजी विषयाचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी केलेला आटापिटा या आत्मकथनात आलेला आहे. तो निश्चितच इंग्रजी शिकणार्‍यांसाठी प्रेरणा ठरेल. किंबहुना कोणताही विषय शिकण्यासाठी तो प्रेरणा ठरेल.इंग्रजी शिक्षणाची सुरुवात ते इंग्रजी विषयातील सर्वाेच्च पदवी पीएच.डी. प्राप्त होईपर्यंत इंग्रजी शिकण्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाची ही कहाणी आहे. एक विषय शिकताना आलेले अपयश आणि त्या अपयशातून फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेली भरारी या आत्मकथनाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळेच हे आत्मकथन  पारंपरिक आत्मकथनापेक्षा वेगळ्या प्रकारचे आहे. त्याच्या जोडीलाच एका आईची मुलानं शिक्षण घेऊन नोकरी करावी यासाठी चाललेली धडपडही या आत्मकथनात प्रकर्षाने अधोरेखित झालेली आहे.

पाचवीपासून इंग्रजी विषय असूनही तो शिकविण्याची अनास्था व सहावीपासून इंग्रजी शिकविण्यासाठी असलेल्या शिक्षकाच्या अध्यापन पध्दतीकडे त्रयस्थपणे पाहण्याचा दृष्टीकोन लहान वयातच अर्जुन कुंभार यांना प्राप्त झाल्यामुळेच हे आत्मकथन सिध्द झाले आहे.

आत्मचरित्रात आत्मचरित्रकार आपल्या गत जीवनाचे अवलोकन करीत असतो. सिंह जसा आपल्या दिमाखदार चालीचे मागे परतून अवलोकन करतो तसे.जीवनात यशस्वी झालेल्या अर्जुन कुंभार यांनीही या आत्मकथनात असेच दिमाखदार वर्णन केले आहे. हे आत्मकथन म्हणजे एका जिद्दी मनाने यश प्राप्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रामाणिकपणे केलेले सिंहावलोकन आहे.म्हणूनच ते अंतःकरणाला भिडते.

हे एकलव्यायन असले तरी श्री.बिरंबोळे गुरुजी,श्री.अकोळकर,श्री.बाबर सर,कल्याणकर सरांचे पूर्ण इंग्रजी बोलण्याच्या तासांनीही त्यांच्यावर काही थोडे संस्कार केले होते. खंडागळे सरांच्या ख्यातीचाही अप्रत्यक्ष प्रभाव अर्जुन कुंभार यांच्यावर दिसतो.बी.जी.देसाई सर, प्रा.शिंदे, प्रा.मगदूम प्रा.अडावकर,प्रा.जोशी सर, प्रा.आजगेकर, प्रा.लीला पाटील, एम.के.पाटील सर, डाॅ.वास्कर सर या काही व्यासंगी मंडळींनी अर्जुन कुंभार या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी केलेले प्रयत्नही दुर्लक्षीत करता येण्यासारखे नाहीत.

तो काळच असा होता की कोणत्याही विषयाचे पूर्ण मार्गदर्शन मिळणे मुष्कील होते.ज्यांच्याकडे उपजतच असे काही गुण होते तेच त्या काळात यशस्वी होत असत.अर्जुन कुंभार सरांकडे ते उपजत होते म्हणून ‘मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार’ या न्यायाने ते यशस्वी झाले.आणि यशस्वी व्यक्तीकडे त्याच्या यशस्वी जीवनाचे रहस्य काय? अशी विचारणा समाज करीत असतो. ती एक मागणीही या लेखनाने पूर्ण केल्याचे दिसते.

आपल्या कुटुंबाची कुतरओढ सांगण्यापेक्षा केवळ शैक्षणिक वाटचालीतील इंग्रजी विषयाचे शिक्षण घेताना न लाभलेल्या वाटा आणि स्वत: घेतलेली वळणे त्यांनी या आत्मकथनात सांगिलेली आहेत. ती निश्वितच मार्गदर्शक ठरणारी आहेत.

आत्मकथनकार आपण ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणाचे चरित्रही कथन करीत असतो.अर्जुन कुंभार यांनी गारगोटीच्या माैनी विद्यापिठाचे, बी.ए.बी.एड.(स्पे.) विभागाचे,शिवाजी विद्यापीठ व इंग्रजी अधिविभागाचे,ते ज्या  शाळेत शिकलेत त्या कूर गावच्या प्राथमिक, मडिलगे गावातील दाैलत विद्या मंदिर, ज्युनि.काॅलेज,गारगोटी, ते जिथं जिथं नोकरीला गेले त्या दाभोळ, कासारवाडा, सरुड अशा ठिकाणाची,तेथील शाळा काॅलेजची चरित्रे या आत्मकथनात आलेली आहेत. हैद्राबाद येथील ग्रंथालयाचे, बालपणी हुंदडलेल्या अनेक ठिकाणांची (गावाशेजारील बामणाचा माळ) चरित्रेही या आत्मकथनात आलेली आहेत.म्हणून हे आत्मकथन पहाटे नुकत्याच फुललेल्या फुलाप्रमाणे ताजे आणि टवटवीत वाटते.

इंग्रजी शिक्षण नव्याने सुरु झालेल्या काळात अर्जुन कुंभार सरांचे शिक्षण सुरु झाले.या काळात कोणत्याही विषयाच्या पदवीधर शिक्षकाकडे किंवा कोणत्याही डिग्रीच्या शिक्षकाकडे केवळ प्रशिक्षणावर आधारित राहून इंग्रजी विषय शिकवायला दिला जात होता.त्यामुळे शिक्षकच इंग्रजी शिकत होते असा तो काळ होता.पहिलीपासून सातवीपर्यंत वर्गात हुशार असणार्‍या व आठवी ते बारावीपर्यंत नापास झालेला अर्जुन कुंभार हा मुलगा माैनी विद्यापीठातील स्पेशल बी.ए.बी.एड.ला गेल्यावर अंतर्बाह्य कसा बदलून जातो हा आत्मकथनकाराने सांगितलेला प्रवास रोमांचकारी व रोचक असा आहे. इंग्रजी विषयात वारंवार नापास होणारा मुलगा इंग्रजी विषयाचा प्रोफेसर बनू शकतो ही या आत्मकथनातून मिळणारी प्रेरणा निश्चितच पुढच्या पिढीला मोठी उर्जा देणारी आहे. असे आत्मकथन किंवा आत्मचरित्र पुढच्या पिढयांना मार्गदर्शक ठरत असते.

हे आत्मकथन वाचता वाचता कधी कधी वाटायला लागते. .अर्जुन कुंभार सरांना कदचित श्री.एम.के.पाटील सर भेटले नसते तर किंवा एम.के.पाटील सरांचा मुलगा उदय त्यांच्या सोबत नसता तर दत्याच्या घरात कागलचा पावणा आलाच नसता तर अर्जुन कुंभार यांच्या कूर या गावापासून उत्तरेला आठ कि.मी.वर माैनी विद्यापीठ नसते तर… गारगोटीत बी.जी.देसाई सरांचे क्लासेस नसते तर… डाॅ. पंडित मॅडम नसत्या तर या सर्वांचे मार्गदर्शन अर्जुन कुंभार यांना प्राप्त झाले. पण शिक्षणाची ओढ, झेप, जिद्द, चिकाटी व अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती होती ती केवळ आणि केवळ अर्जुन कुंभार यांची म्हणूनच हे एकलव्यायन आहे.

आत्मकथनाचे मूल्यमापन गुण आणि दोष या पध्दतीने केले जाते.मधाच्या पोळ्यातसुध्दा दुर्मीळ ठिकाणी कडवटपणा असू शकतो. तसा एखादा दोष या आत्मकथनात आढळतो.वेदसागरच्या शेवटच्या साहित्य संमेलनात  मुंबईपासून दारु ढोसत आलेला पाहुणा कोण? हे स्पष्ट व्हायला हवे होते. अर्थात या संमेलनाचा भाग सांगणे हा या आत्मकथनाचा उद्देश नाही.

आत्मकथनात भीडभाड, लपवाछपवी, संकोच या बाबींना थारा नसतो.स्पष्टपणा, नि:संकोचपणा,प्रांजळपणा ही आत्मकथनाची वैशिष्ट्यं असतात. उल्लेखित दोष अपवाद म्हणायला हरकत नाही.

मराठी भाषेतील वाङमय प्रकारात आत्मचरित्र, आत्मकथा आत्मवृत्त, स्वकथन, स्वमीमांसा,आत्मकथन या नावाने ओळखला जाणारा एक वाङमय प्रकार आहे.’अर्जुनाचे एकलव्यायन’ हे आत्मकथन या वाङमय प्रकारात अगदी वेगळ्या प्रकारचे व वेगळ्या पध्दतीने शोभून दिसेल असे आहे.अलिकडे मराठी भाषेत अशा आत्मकथनांची वाणवा आहे. अर्जुन कुंभार यांचे हे आत्मकथन ही वाणवा दूर करणारे आहे. म्हणूनच अशी नवीन जीवनानुभव मांडणारी आत्मकथने गरजेची आहेत. अशा अंगाने विचार करता आत्मकथन या वाङमय प्रकाराच्या इतिहासात ‘अर्जुनाचे एकलव्यायन’ या आत्मकथनाची नोंद निश्चितपणे करावी लागेल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks