यूपीएससी परीक्षेत गारगोटीचा आनंद पाटील देशात ३२५ वा

गारगोटी प्रतिनिधी :
लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत आनंद अशोक पाटील हा देशामध्ये ३२५ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्यास अल्पदृष्टी असताना देखील त्याने हे घवघवीत यश संपादन करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आनंदचे प्राथमिक शिक्षण गारगोटी येथील नूतन मराठी विद्यालय येथे झाले असून माध्यमिक शिक्षण आंबोली येथील डायनामीक इंग्लिश पब्लिक स्कुल मध्ये झालेले आहे. गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या आयसीआरई मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा केला तर इस्लामपूर येथील आर.आय.टी. विद्यालयात २०१७ मध्ये बिटेक डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. २०१८ साली त्याने यूपीएससीची मुख्य परीक्षा पास केली मात्र मुलाखतीमध्ये त्यास यश आले नाही. पुन्हा त्यास २०१९ मध्ये ही यश आले नाही. तरीदेखील अपयशाने खचून न जाता पुन्हा त्याने खडतर परिश्रम घेऊन जानेवारी २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले. ०३ ऑगस्ट २०२१ रोजी त्याची मुलाखत झाली. या परीक्षेचा आज निकाल लागला. तो देशामध्ये ३२५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
आनंदच्या या घवघवीत यशाचे संपूर्ण देशभरातून कौतुक करण्यात येत आहे.