शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या दिनाचे औचित्य साधून ओंकार फाउंडेशन तर्फे शिवराई आणि होन यांची माहिती देणारी २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून ओंकार वेल्फेअर फाउंडेशन कोल्हापूर तर्फे राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सुरू केलेल्या शिवराई होन या दोन नाण्यांचा जनतेला परिचय व्हावा म्हणून २०२४ ची दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे या दिनदर्शिका प्रकाशन समारंभ सोमवार दिनांक २०२४ रोजी सायंकाळी सात वाजता कोल्हापूर मर्दानी खेळाचा आखाडा यांच्या सहकार्याने माननीय केशवराव जाधव अतिरिक्त आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय फत्तेसिंग जाधव यांचे हस्ते संपन्न झाला.प्रमुख मान्यवरांचा सत्कार शिवराई चलन देऊन करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना केशवराव जाधव यांनी छत्रपती शिवराय हे भूतलावरील अद्वितीय राजे होऊन गेले. त्यानी केलेले कार्य सर्वच पिढ्यांना चिरंतन मार्गदर्शन करत राहणारे आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या युवकांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करावी. राष्ट्र आणि समाजासाठी स्वतःला सशक्त आणि बलवान बनवावे. आज देशांमध्ये अनेक समस्या आवासून उभ्या असताना सामर्थ्यशाली शिवराय विचाराचा युवकच त्यावर मात करू शकेल. यासाठी छत्रपतींच्या वारशाचे युद्धनीतीचे, कला कौशल्याचे आणि सामाजिक सांस्कृतिक विचारांचा जागर सतत करत राहिला पाहिजे. ओंकार वेल्फेयर फाउंडेशन कामातून ओळख निर्माण करणारी संस्था असून श्री अमोल सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोल्हापूर मर्दानी खेळाचे श्री विनोद साळुंखे यांच्या सहकार्याने सामाजिक उत्तरदायित्वाचे काम अतिशय प्रभावीपणे पार पाडत आहे. याचा मला याचा निश्चितच अभिमान वाटतो.’
मा. फत्तेसिंग जाधव यांनी आपल्या मनोगत मध्ये `मर्दानी खेळ हे टिकले पाहिजेत.शिवरायांचे विचार शिवरायांचे कार्यकर्तृत्व शिवरायांची गाथा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये प्रत्येक युवकाच्या जगण्यामध्ये पेरण्याची जिजाऊ मांसाहेबासारखी क्षमता आमच्या माता भगिनींमध्ये निर्माण झाली पाहिजे. शिवरायांचे आद्य गुरु मां जिजाऊ होत्या. त्यांच्या भरवक्कम कुशल चातुर्यपूर्ण मार्गदर्शनाखाली शिवरायांनी बहुजनांचे स्वराज्य निर्माण केले. आज शिवरायांच्या बद्दल भेदाभेद पूर्ण मतप्रणाली माडंली जात असताना प्रत्येक मातेने जिजाऊचा रोल अदा केल्यास पुन्हा एकदा शिवरायांचे स्वराज्य निर्माण होऊन सर्वांना सुखी समाधानी जीवन जगता येईल याची खात्री आहे.’ असे प्रतिपादन केले.
ओंकार वेल्फेअर फाउंडेशनचे मार्गदर्शक प्राचार्य टी.के.सरगर यांनी ओंकार वेल्फेअर फाउंडेशनच्या आजपर्यंतच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.
या कार्यक्रमासाठी ओंकार वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अमोल सरनाईक उपाध्यक्ष श्री रमेश साळुंखे लेखापरीक्षक श्री शिवराज पाटील संचालक श्री सरनाईक आणि विविध मान्यवर व मर्दानी खेळाचे ५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक कोल्हापूर मर्दानी खेळाचे श्री विनोद साळुंखे यांनी केले पाहुण्यांचा परिचय आणि दिनदर्शिकेची माहिती श्री ओंकार मोरे यांनी करून दिली.आभार श्री मोहन सुर्वे यांनी मानले.