ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून हॉस्पिटलमधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या तसेच तो पळून गेल्याचा बनाव करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस नाईक नाथाराम भरत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव अशी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी (दि. 20) हे आदेश काढले.

नाथराम काळे आणि अमित जाधव यांची कोर्ट कंपनी म्हणून नेमणूक केली होती. कारागृहातील कैद्यांना ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी काळे व जाधव यांना बंदोबस्तावर नेमण्यात आले होते. ललित पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला असताना त्याच्यावर लक्ष ठेवले नाही. तो ससून रुग्णालयातून पळून गेला. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये काळे आणि जाधव या दोघांनी ललित पाटील याला हॉस्पिटलमधून पळून जाण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाले होते. ललित पाटील पाठोपाठ काळे हा हॉस्पिटल जवळ असलेल्या लेमन ट्री हॉटेलमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. याआधी देखील काळे याने पत्नीच्या मनाविरुद्ध गर्भपात केल्याबद्दल 2014 मध्ये वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी काळे याला निलंबित केले होते.

अमित जाधव याने ललित पाटील याला पळून जाण्यास मदत केल्यानंतर विनय आरान्हा याचा ड्रायव्हर दत्तात्रय डोके याच्याशी संपर्क साधला होता. दोघेही ससून हॉस्पिटलमधील कॅन्टीनजवळ एकत्रिरित्या येऊन एकमेकांना टाळी देताना दिसून आले होते. जाधव हा यापूर्वीही 59 दिवस परवानगी न घेता गैरहजर राहिला होता. मुंढवा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात 2022 मध्ये त्याला निलंबित केले होते.

ललित पाटील प्रकरणात सहभाग आढळून आल्याने या दोघांना नुकतीच अटक करण्यात आली असून सध्या त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दोघांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याने त्यांना पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks