15 लाखांची लाच घेताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, ACB ची मोठी कारवाई

नाशिकमधील तहसीलदाराला 15 लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. नाशिक एसीबीच्या पथकाने ही मोठी कारवाई शनिवारी (दि.5) केली आहे. नरेशकुमार तुकाराम बहिरम (वय – 44 तहसीलदार नाशिक, सध्या रा. फ्लॅट नंबर -604, बी विंग, मेरिडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तहसीलदाराचे नाव आहे.
गौण खनिज प्रकरणातील सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी नरेश कुमार यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत नाशिक येथील 52 वर्षीय व्यक्तीने नाशिक एसीबीकडे तक्रार केली आहे. महसूल विभागातील मोठा मासा एसीबीच्या गळाला लागल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीच्या मालकाने यांच्या जमिनीमध्ये मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम 1 कोटी 25 लाख 6 हजार 220 रुपये दंड आकारणी केली. बाबत नरेश कुमार यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालकाने थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन हे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी स्पष्ट केले होते. जमीन मालकाने सांगितल्याप्रमाणे याची पडताळणीसाठी नरेश कुमार यांनी जमिनीच्या मालकाला राजुर बहुला येथे स्थळ निरीक्षण ळी बोलावले होते. परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिले. तक्रारदार हे तहसीलदार यांनी नरेश कुमार यांची स्थळ निरीक्षण वेळी भेटली घेतली.
त्यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15 लाख रुपयांची लाच स्वरूपात मागणी केली.
सदरील लाच मागणी केल्याचे पडताळणी पंचनामा वेळी मान्य करून लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम आज (शनिवार) स्वीकारल्याने नरेशकुमार तुकाराम बहिरम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर ,अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे ,
पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत , पोलीस अंमलदार गणेश निबाळकर, प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने केली.