ताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर :

जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता बाधित रुग्णांना गृह विलगीकरण ऐवजी कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाणार आहे. त्याचबरोबर, वाढती संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा प्रशासन त्यासंदर्भातील आदेश जारी करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिृकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी अशोक राठोड आदीची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, सध्या जिल्ह्यासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात तसेच प्रामुख्याने नगर शहरात विनामा्स्क फिरणारे नागरिक दिसत आहेत. संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक जागांवर नागरिक विनामास्क दिसणार नाहीत, यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे. नागरिकांनीही त्यादृष्टीने स्वताच्या आणि इतरांच्याही आरोग्याचा विचार केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. महानगरपालिका क्षेत्रात तसेच काही तालुक्यांच्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी यासाठी केली जावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सध्या जिल्हा प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या आणि संभाव्य वाढ लक्षात घेऊन नियोजन केले आहे. कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात अधिक औषधसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील १०० दिवस अतिशय महत्वाचे असून त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात आठवडे बाजाराला बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात आली आहे. जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वांनी मास्कचा वापर केला तर धोका टळू शकेल. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक सर्वांनीच याबाबत मास्कचा आग्रह धरला पाहिजे, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात काही खासगी रुग्णालयांकडून वाढील बिले आकारत असल्याचा तक्रारी येत आहेत. त्याची शहानिशा करुन अशा प्रकरणी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks