बिद्रीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन

बिद्री ता. १९ ( प्रतिनिधी / अक्षय घोडके) :
मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रति टन ४०० रुपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून बिद्री ( ता. कागल ) येथील गारगोटी-कोल्हापूर मुख्य राज्यमार्गावर उस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. शिवाय आंदोलकांनी कागल, राधानगरी व भुदरगडचे प्रवेशद्वार असलेल्या मुधाळतिट्टा येथेही चक्का आंदोलन केले. त्यामुळे चारही बाजूंना वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.

यावेळी शेतकऱ्यांनी ऊस दर आमच्या हक्काचा ; नाही कुणाच्या बापाचा, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय ; मागील गळीताचे ४०० रुपये मिळालेच पाहिजेत ; यंदा ३५०० रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या ठिकाणी मुरगुड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी स्वाभिमानीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अजित पोवार, माजी जि. प. सदस्य मनोज फराकटे, नंदकुमार पाटील, बालाजी फराकटे, बाळासो पाटील, डॉ.विनायक जगदाळे, संजय फराकटे, संग्राम साठे, विष्णू मगदूम, रोहित जाधव, श्रीनाथ साठे, धोंडीराम रामाणे, मोहन साठे, पांडूरंग साठे, पांडूरंग जांभळे, आनंदी पाटील अंजना पाटील, विकास पाटील, बाजीराव पाटील, यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.