ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : एसटी कर्मचारी संघटना कृती समितीचे बेमुदत उपोषण आंदोलन सुरु

कोल्हापूर प्रतिनिधी :

ऑक्टोबर २०१९ पासूनचा प्रलंबित महागाई भत्ता फरक मिळावा, शासनाप्रमाणे २८% महागाई भत्ता लागू करावा तसेच महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागण्यांसाठी राज्यस्तरीय सर्व संघटना कृती समितीच्या आदेशानुसार कोल्हापूर विभागातील सर्व एसटी कर्मचारी संघटना कृती समितीचे आजपासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू झाले आहे.

महामंडळातील राज्यस्तरीय सर्व संघटनांच्या कृती समितीने दि. २०.१०. २१ रोजी ऑक्टोबर २०१९ पासूनचा प्रलंबित महागाई भत्ता फरक मिळावा, शासनाप्रमाणे २८% महागाई भत्ता लागू करावा, वेतनवाढीचा दर प्रशासनाने मान्य केल्याप्रमाणे २% वरून ३% करावा, घरभाडे भत्ता ७-१४-२१% ऐवजी ८-१६-२४% करावा, दिवाळीसाठी सानुग्रह आनंद १५००० रुपये मिळावे तसेच महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागण्यांचे निवेदन पत्र मा. उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना दिले होते.

यावर प्रशासनाकडून कृती समितीबरोबर कोणतीच चर्चा केलेली नाही. शिवाय शासनाने जाहीर केलेली ५% महागाई भत्ता वाढ आणि २५०० रुपये बोनस याबाबी कर्मऱ्यांना मान्य नाहीत, ५% महागाई भत्त्याने कामगारांना सरासरी ६०० ते ७०० रुपये इतकीच वाढ होते, ती तुटपुंजी असून हा कर्मचारी वर्गावर अन्याय असून याचा कामगारांच्यात प्रचंड असंतोष आहे.शासनाकडून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना भरघोस वाढ असून त्यांना २८% महागाई भत्ता दिला जातो. पण एसटी कामागराबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामुळे जोपर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले नाही असा पवित्रा यावेळी घेण्यात आला.

याशिवाय टप्प्याटप्प्याने या आंदोलनाची व्याप्ती वाढणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाचे निवेदन कोल्हापूर विभागाच्या कामगार अधिकारी मनीषा पवार यांनी एसटी कर्मचारी संघटना कृती समितीने दिलेले आहे.बेमुदत उपोषण आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून अध्यक्ष उत्तम पाटील, सचिव वसंत पाटील, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून अध्यक्ष बी. आर. साळोखे, सचिव संजीव चिकुर्डेकर, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसकडून अध्यक्ष आनंदा दोपरे, सचिव आप्पा साळोखे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून अध्यक्ष प्रवीण म्हाडगुत, सचिव तकदीर इचलकरंजीकर, महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेकडून अध्यक्ष निशांत चव्हाण, सचिव महावीर पिटके, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेकडून अध्यक्ष सुनील कांबळे, सचिव दादू गोसावी हे पदाधिकारी सामील झाले आहेत. सदर आंदोलनास विभागातील सर्व संघटनेच्या पदाधिकारी, सभासद यांनी पाठिंबा दिला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks