कागलच्या लक्ष्मी टेकडी जवळ उड्डाणपूल उभा करावा ; तर कागल बसस्थानका जवळील अरूंद पूल रूंद करा ; केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे समरजितसिंह घाटगे यांची मागणी

कागल प्रतिनिधी :
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागलच्या लक्ष्मी टेकडी जवळ कागल ते सातारा सहापदरीकरण कामा वेळी उड्डाणपूल उभा करावा. तसेच कागल एसटी स्टॅन्ड जवळील उड्डाण पूल मोठा करावा. अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होत आहे. यावेळी कागल जवळील लक्ष्मी टेकडी येथे उड्डाणपूल उभा करावा. या टेकडीच्या पूर्व बाजूला पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. तर उत्तर बाजूला गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत आहे. त्याचप्रमाणे विविध साखर कारखाने व अनेक छोटे-मोठे प्रकल्प या परिसरामध्ये कार्यरत आहेत. या सर्वांच्या वाहतुकीचा परिणाम मोठ्या वर्दळीच्या रूपात होत असतो. त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा लहान मोठे अपघात होऊन कित्येक लोक मृत्युमुखी पडले आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास या अपघातांच्या प्रमाणात घट होईल. शिवाय वाहतुकही सुरळीतपणे चालू राहील.
त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर कागल शहराजवळ एस.टी.बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेला पूल अतिशय लहान आहे.या ठिकाणीही वाहतुकीचा प्रचंड ताण पडत असतो. त्यामुळे अनेक वेळा अपघात घडले आहेत. येथे ट्रॅफिक जाम असते.त्यामुळे हा लहान असलेला पूल मोठा करणे गरजेचे आहे.तरी महामार्गाचे सहापदरीकरण यावेळी या दोन्ही कामांचा विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमालाला कोकणची बाजारपेठ उपल्बध होण्यासह कोकणला जोडणारा जवळचा व सोयीचा ठरणाऱ्या बेळगाव- सावंतवाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गास मान्यता मिळावी.त्यामुळे मध्य रेल्वे कोकण रेल्वेशी जोडली जाईल. तसेच बेळगाव वेंगुर्ले या महामार्गाच्या रूंदीकरणाचे कामही विचाराधीन घ्यावे.अशी विनंतीही मंत्री गडकरी यांना श्री. घाटगे यांनी यावेळी झालेल्या चर्चेवेळी केली.