महावितरण कडून ” सामाजिक बांधिलकी ” जपणेचे कर्तव्य पार

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके :
शाखा कार्यालय बाचणी अंतर्गत येणाऱ्या केंबळी ता.कागल जि. कोल्हापूर गावातील वृद्ध महिला शांताबाई संभाजी पाटील आपल्या दोन मतिमंद मुलांसह परिस्थितीशी झगडत अंधारातच आपल्या संसाराचा गाडा ओढत असले बाबतची माहिती मिळताच शाखा कार्यालय बाचणीचे शाखा अभियंता पृथ्वीराज घोडके व केंबळी गावातील वरिष्ठ तंत्रज्ञ दिगंबर चांदेकर यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर गावांमध्ये जाऊन त्या वृद्ध मातेच्या घराची पाहणी करून, ग्रामपंचायत केंबळी यांच्याशी संपर्क करून २४ तासांमध्ये कागदपत्रांची स्वतः पूर्तता करून व वीज कनेक्शन साठी आवश्यक सर्व रक्कम स्वतः भरून सर्व साहित्यासह तात्काळ वीज जोडणी करून देऊन महावितरण कडून ” सामाजिक बांधिलकी ” जपणेचे कर्तव्य पार पाडले. अंधकारातून प्रकाशाकडे जात असताना त्या वृद्ध मातेच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.
महावितरणकडून कोल्हापूर ग्रामीण विभाग १ चे कार्यकारी अभियंता श्री दीपकराव शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते व इस्पुर्ली शाखा अभियंता श्री सुभाष पाटील आणि प्रधान-तंत्रज्ञ युवराज शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये शाखा अभियंता श्री पृथ्वीराज घोडके व वरिष्ठ तंत्रज्ञ दिगंबर चांदेकर यांनी स्वखर्चातून हा सामाजिक उपक्रम राबविला. सदर सामाजिक उपक्रमास केंबळी गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री सुधीर ज्ञानदेव पाटील श्री शिवाजी आनंदा पाटील व प्रतिष्ठित नागरिक श्री यशवंत दादू पाटील, श्री उत्तम ईश्वरा कांबळे, श्री प्रवीण यशवंत पाटील, श्री विश्वनाथ पाटील, श्री मोला दादू सय्यद हे उपस्थित होते. महावितरणने राबविलेल्या या सामाजिक उपक्रमाचे केंबळी ग्रामस्थांच्याकडून कौतुक करण्यात आले.