मुरगूड येथील गोपाळराव सूर्यवंशी वाचनालयात वाचन सप्ताह निमित्त ग्रंथ प्रदर्शन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता. कागल येथील श्रीमान गोपाळराव सूर्यवंशी वाचनालय येथे वाचन सप्ताहाचे आयोजन 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे.या निमित्ताने स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचा शुभारंभ पत्रकार ओंकार पोतदार यांचे हस्ते फीत कापून करण्यात आला.
श्रीमान गोपाळराव सूर्यवंशी वाचनालयाची स्थापना १९९८ साली झाली असून वाचनालयाकडे १५००० पेक्षा जास्त ग्रंथसंपदा असून वाचनालयाचे ५०० सभासद आहेत तर रोजचा वाचक वर्ग २५० इतका आहे. या वाचनालयामध्ये दुर्मिळ पुस्तके पहावयास मिळतात या निमित्ताने दरवर्षी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
यावेळी संस्थापक उद्योगपती ज्योतीराम सूर्यवंशी यांनी बोलताना सांगितले की, वाचन संस्कृती टिकून राहावी आणि ती वाढावी यासाठी या वाचनालयाचे कार्य सुरू असून वाचक वर्गाची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे.वाचनालय मध्ये दुर्मिळ ग्रंथसंपदा असून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक अशी पुस्तके देखील या ठिकाणी आहेत.त्यामुळे अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्याचा लाभ घेत असतात.
यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक पांडुरंग सारंग, संस्थेचे सचिव टी एम सामंत , अजित नदाफ,एस एन तराळ , ग्रंथपाल नंदकुमार पाटील , धनश्री गुरव उपस्थित होते.