नैसर्गिक रंगांची उधळण करीत साजरी केली रंगपंचमी , बोरवडेच्या प्राथमिक शाळेच्या मुलांचा अनोखा उपक्रम

बिद्री प्रतिनिधी/ अक्षय घोडके :
रंगपंचमी म्हणजे बच्चे कंपनीला एक पर्वणीच. परंतू गेल्या काही वर्षांपासून या दिवशी रासायनिक रंग वापरण्यात येत असल्याने लहानग्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याला फाटा देत बोरवडे ( ता. कागल ) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत पर्यावरणपूरक व आनंददायी रंगपंचमी उत्सव साजरा केला.
गेल्या आठवडाभरापासून रंगपंचमीनिमित्त बाजारपेठा विविध पिचकार्या व रासायनिक रंगांनी सजल्या होत्या. रासायनिक रंगांमुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्राथमिक शिक्षिका सौ. सविता पाटील यांनी चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना भाज्या, फळे, फुले यापासून नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले.यात बीट, जांभूळ, जास्वंदीची फुले, हळद, कांगुण्या, चांदणी गुलाबाची फुले, झाडाची पाने, झेंडूची फुले यांपासून रंग बनवले होते.
रासायनिक रंगांनी रंगपंचमीच्या सणात रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरा करण्याचा उद्देश त्यांनी यावेळी मुलांना समजावून दिला. शिवाय मुलांकडून अशी रंगपंचमी साजरी करण्याची आणि पर्यावरण रक्षणाची शपथही घेतली. वर्गातील मुलांनीही असे रंग बनवून आणत आज शाळेत रंगपंचमी साजरी केली. नैसर्गिक रंगांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींचे चेहरे आकर्षक पद्धतीने रंगवून रंगपंचमीचा आनंद लुटला.
या अनोख्या उपक्रमाचे मुख्याध्यापक ज. रा. पाटील, सर्व शिक्षक वर्ग आणि पालकांनी कौतुक केले.
बोरवडे : येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग बनवून आणले होते.