बिद्री-पिराचीवाडी एसटी पूर्ववत सुरु करावी ; अन्यथा आंदोलन करण्याचा माजी विद्यार्थी संघाकडून इशारा

बिद्री प्रतिनिधी अक्षय घोडके :
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली बिद्री-पिराचीवाडी एसटी पूर्ववत सुरु करावी ; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दूधसाखर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.
बिद्री ( ता.कागल ) येथील दूधसाखर विद्यानिकेतन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात पिराचीवाडी, सावर्डे बुद्रुक व सोनाळी गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शिवाय बिद्री साखर कारखान्याचे कामगारही या गावांतून येतात. त्यांना ये – जा करण्यासाठी या गावांतून बिद्री – पिराचीवाडी मार्गावर एसटी येत असे. परंतू मागील काही दिवसांपासून ही एसटी बंद असल्याने विद्यार्थी आणि कामगार वर्गाची कुचंबणा होत आहे.
याचा विचार करुन पिराचीवाडी, सोनाळी, बिद्री या मार्गावर सकाळी ६.३० आणि दुपारी १२.०० वाजता पूर्वीप्रमाणे बस सोडली जावी अशी मागणी होत आहे. या मागणीचे निवेदन माजी विद्यार्थी संघाकडून एसटीच्या आगारप्रमुखांना देण्यात आले आहे. याची दखल घेऊन या मार्गावर एसटी सुरु करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थी-विद्यार्थिनी व माजी विद्यार्थी संघामार्फत रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच दुधसाखरचे विद्यार्थी-विद्यार्थीनी व साखर कारखान्याचे कामगार उपस्थित होते.