कागल तालुक्यातील हुजरेगिरी आणि मुजरेगिरीसह सरंजामदारी मोडून काढूया : मुरगुडमध्ये प्रवीणसिंह पाटील यांचे प्रतिपादन ;बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य, अपघाती मदत, अपंगत्वाची मदत व शिष्यवृत्ती प्रदान.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यात सरंजामशाही पुन्हा डोके वर काढत आहे. त्यांच्या मुजरेगिरी व हुजरेगिरीसह सरंजामदारी मोडून काढूया, असे प्रतिपादन मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केले. इथल्या जनतेने राजेशाहीला कधीही थारा दिलेला नाही, असेही ते म्हणाले.
मुरगुडमध्ये कै. सौ. सुलोचनादेवी विश्वनाथराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच वाटप व धनादेश वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
भाषणात प्रवीणसिंह पाटील पुढे म्हणाले, कोणतेही जनसामान्याचे काम न करता विरोधक आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांना पराभूत करण्याची वल्गना करीत आहेत. मुश्रीफांबद्दल कोणताही अपशब्द यापुढे खपवून घेतला जाणार नाही. आमदार श्री. मुश्रीफसाहेब यांना पराभूत करणारा अद्याप तरी जन्माला आलेला नाही, असेही ते म्हणाले. या सर्व परिस्थितीत आम्ही पहाडासारखी त्यांच्या पाठीशी उभे राहू.
आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणाले, निराधारांची पेन्शन योजना असो, गोरगरिबांच्या वैद्यकीय सेवेची योजना असो की बांधकाम कामगारांच्या कोट-कल्याणाच्या योजना असोत. गोरगरिबांच्या तळमळीतूनच मी या योजना सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे त्यावर शिक्का माझाच आहे, तो कधीच पुसला जाणार नाही.
“जनता आंधळी नाही……”
प्रवीणसिंह पाटील म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा पराभव करतो म्हणणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे कागल तालुक्यातील जनता आंधळी नाही. आमदार मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना घरादारापर्यंत नेल्या आहेत. त्यांच्या हाकेला ऊभे राहा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात श्रीमती विमल सातापा डेळेकर यांना दोन लाख, सागर मधुकर वाघरे यांना अपंगत्वाबद्दल दोन लाख, अश्विनी एकनाथ हासबे यांना विवाहासाठी ५१ हजार, शुभांगी सुखदेव चौगुले यांना शिक्षणासाठी ६० हजार याप्रमाणे धनादेशाचे वाटप झाले.
व्यासपीठावर शिवाजीराव पाटील, शामराव घाटगे, रणजित सूर्यवंशी, सत्यजितसिंह पाटील -आबा, प्रकाश रामाने, राजू आमते, कुंडलिक भांडवले, राहुल वंडकर , साताप्पा पाटील, गणपती बारड, बाजीराव दबडे,नामदेव भांदिगरे, रणजित मगदूम ,सम्राट मसवेकर , बाळासाहेब आंगज , दिग्विजय चव्हाण(गुंड्या ), स्वप्निल गंगाधरे,रोहित मोरबाळे मान्यवर उपस्थित होते.
स्वागत ॲड. सुधीर सावर्डेकर यांनी केले. प्रास्ताविक दिग्विजयसिंह पाटील-भैय्या यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. आभार मनाजी सासने यांनी मानले