मुरगूड : ऑक्सिजन पार्कला कोणी ऑक्सिजन देता ऑक्सिजन ; पालिकेचे दुर्लक्ष तर नागरिकांची कर्तव्यात कसूर ; लाखो रुपयांचा खर्च वाया

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील सौ.सुलोचनादेवी जलाशय व शिवाजी विद्यामंदीर शाळेच्या मध्यभागी ४५ लाख रुपये खर्चून उभारलेल्या नगरपालिकेच्या ‘ऑक्सिजन पार्क’ लाच कोणी ऑक्सिजन देता ऑक्सिजन अशी म्हणण्याची वेळ आली आहे . इतकी दुरावस्था शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या व आरोग्यदायी ठरलेल्या या ऑक्सिजन पार्कची झाली आहे .नगरपालिकेच्या मालकीचा ऑक्सीजन पार्क असल्याने त्यांची जबाबदारी आहेचं तरीही आपण जबाबदार नागरिक या नात्याने त्याच्या रक्षणाची कर्तव्ये विसरलो की काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकातून व्यक्त होत आहे .

मुरगूड शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि मुलांच्या,ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन पार्क २०१५-१६ साली शासनाच्या नाविण्यपूर्ण फंडातून सुमारे ४० ते ४५ लाख रुपये खर्च करून मोठा गाजावाजा करीत पालिकेने तयार केला . त्यामध्ये विविध शोभेची रोपे,फुलझाडे,औषधी वनस्पती,मऊ लुसलूशीत गवत,रंगीबेरंगी पथदिवे,लहानग्यांना खेळण्या बागडण्यासाठी तसेच नागरिकांना फिरण्यासाठी फुटपाथ, बसण्यासाठी कठडे,अशा सर्वप्रकारच्या सेवा – सुविधांनी परिपूर्ण अशा पार्कने मुरगूडकरांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र कसाबसा वर्षभर हा पार्क सुस्थितीत राहिला. त्याचा देखभाल दुरुस्तीचा खर्च करताना पालिका प्रशासन हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .
ऑक्सिजन पार्कच्या उशाशी दहा फुटावर जलाशय असताना देखील त्यातले पाणी उपसा करुन पार्कातील झाडांना पुरवण्याचे साधे सोपे काम देखील पालिका प्रशासनाला करता आले नाही.त्यामुळे पाण्याअभावी हळू – हळू येथील फुलझाडे वाळली जात आहेत .त्यापाठोपाठ शोभेची व औषधी वनस्पतीही वाळून गेल्या.त्यानंतर या ऑक्सिजन पार्कला अक्षरशः उतरती कळा लागली. तरुणाईच्या रात्री ‘ओल्या पार्ट्या’ नी इथला ऑक्सिजन बिघडू लागला . ऑक्सिजन घेण्याच्या पार्कात दारूचे घोट घेतले जावू लागले . इतकं सगळ सुरु असतानाही पालिका प्रशासन नुसतं बघत राहिले. चारी बाजूंनी कंपौंड वॉलमध्ये बंदिस्त असतानाही या पार्क मधील ऑक्सिजन कधी गेला कळलेच नाही . इतकी दुरावस्था झालेली आहे.
सध्या याठिकाणी युवकांचे वाढदिवस साजरे करण्याचे केंद्र बनले आहे . त्या ठिकाणी खाण्यासाठी आणलेले साहित्य तेथेच टाकून जात आहे .आईस्क्रीमचे रिकामे कोन,केकचे कागद हे इतस्ततः फेकून द्यायचे. त्याचबरोबर जेवणावळी झोडून खरकट्या पत्रावळ्या – द्रोण व इतर साहित्य टाकून जायचे.तर दारुच्या बाटल्याही ठिकठिकाणी फेकून द्यायच्या . कचऱ्याचे ढीग तर ठरलेलेच . पार्कातील काही पेव्हींग ब्लॉक निखळलेले तर काहींनी ते गायब करण्यात धन्यता मानलेली दिसत आहे .पार्कच्या गेटला कोणी वालीच नसल्याने ते सर्वांसाठी खुले अशीच अवस्था आहे. म्हणूनच या पार्कमधील ऑक्सिजन कधी निघुन गेला कळलेच नाही .
पार्कचा वापर राजरोसपणे क्रिकेट खेळण्यासाठी होत आहे .पार्कमध्ये रात्री फिरणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी लावलेले दिवे वायरिंगसह कधीच गायब झाले आहेत.त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी क्षणबर विश्रांती घेण्याऐवजी जवळच असलेल्या मारुती मंदिरामध्ये जाऊन बसणे पसंत करीत आहेत . या पार्कमधील ऑक्सिजन संपल्याने गुदमरलेल्या पार्कचा होत असलेला कोंडमारा नगरपालिकेला दिसत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत असला तरी शासनाने ऑक्सिजन पार्क बरोबरच इतर विकासकामे ही आपल्या सोयीसाठी, हितासाठी बनवलेली असतात . याचेही नागरीकांनी भान राखण्याची गरज निर्माण झाली आहे .
गाजावाजा झालेला हा ऑक्सिजन पार्क मुरगूडच्या वैभवात भर टाकणारा ठरला होता . मात्र आता त्याच पार्कची सर्वच बाबतीत प्रचंड हेळसांड होत आहे.पार्कातील पत्रावळ्या,आईस्क्रीमचे कोन, दारूच्या बाटल्या सकाळी फिरायला येणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांनी गोळा करून जाळाव्यात यासारखे दुर्देव काय ? नागरिकांनो आपल्या आरोग्यासाठी उभारलेल्या पार्कचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे याचे भान विसरू नका . तसेच पालिकेनेही याकडे गांभीर्याने लक्ष देवून पार्कला पुन्हा गतवैभव मिळवुन द्यावे .
नगरसेवक- राहुल वंडकर ( विरोधी पक्ष नेते मुरगुड)