कोल्हापूर : पोषण आहारात प्लास्टिक तांदूळ ?

चंदगड प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना व स्तनदा आणि गरोदर मातांना दिल्या जाणार्या मोफत पोषण आहाराच्या तांदळामध्ये प्लास्टिकसदृश तांदूळ भेसळ होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चांगला आणि प्लास्टिक तांदूळ विभक्त केल्याचा सबळ पुरावा मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथील एका शाळेत घडला. तांदूळ शिजवून खाल्लेल्यांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता ‘फूड पॉईझनिंग’ (अन्नपदार्थांची बाधा) झाल्याचे सांगण्यात आले.
या भेसळीबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करणार असल्याचे मुरकुटेवाडी ग्रामपंचायतीने ठरवले आहे.तांदळात भेसळ झाल्याने अनेकांना उलट्या, जुलाब, पोटात दुखू लागले आहे. प्लास्टिक तांदूळ पाण्यात टाकल्यानंतर न उकळताच त्याचे पीठ होते व तांदूळ चिमटीने कुस्करतो. तसेच त्याची चवही प्लास्टिकसारखी आहे. 50 किलोंच्या पोत्यात तब्बल 10 किलो प्लास्टिक तांदूळ भेसळ केल्याचे निदर्शनास आले आहे.