ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयोगाचे समन्स ; कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशीला बोलावले

पुणे टीम ऑनलाईन :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरेगाव-भीमा हिंसाचार चौकशी आयोगाने समन्स पाठवले आहे. शरद पवार यांना 5 मे रोजी चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील आयोगाच्या दालनात पवार यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल व मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांचा समावेश असलेल्या द्विसदस्यीय चौकशी आयोगाने यापूर्वीही पवार यांना 23-24 फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्याकरिता पाचारण केले होते. मात्र, त्यावेळी पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र द्यायचे असल्याचे सांगून आयोगाला पुढची तारीख देण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे आयोगाने मुंबईत 5 ते 11 मे या कालावणीत होणाऱ्या सुनावणीदरम्यान 5 मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

कोरेगाव-भीमा हिंसाचार चौकशी आयोगातर्फे मुंबईत 5 ते 7 मे आणि 9 ते 11 मे असे सहा दिवस साक्षी नोंदवण्याचे काम होणार आहे. त्यापैकी पहिल्याच दिवशी पवारांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शरद पवार यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा आयोग नेमण्यात आला आहे

दरम्यान, या आयोगाने 18 मार्च 2020 रोजी शरद पवारांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे नंतर आयोगाचे कामकाज ठप्प झाले होते. ते आता पुन्हा सुरू होणार आहे. पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. त्यात एकाचा मृत्यू झाला होता तर दहा पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव-भीमा हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks