शिवसेना कधीच पाठीमागून वार करत नाही शत्रूला अंगावर घेऊन समोरून वार करून हरविण्याची आमची मर्दाची पद्धत : शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी :
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला होता. ही जागा काँग्रेसला सोडल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज झाले होते. मात्र पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अखेर क्षीरसागर यांनी आपली तलवार म्यान केली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता क्षीरसागर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. प्रचारात त्यांनी पहिला निशाणा थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर लगावला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठक झाली. या बैठकीत बोलताना क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवसेना कधीच पाठीमागून वार करत नाही. शत्रूला अंगावर घेऊन समोरून वार करून हरविण्याची आमची मर्दाची पद्धत आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना शिवसैनिक विजयी करून दाखवतील. शिवसैनिकांचे एकही मत भाजप उमेदवाराच्या बाजूने जाणार नाही.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजेश क्षीरसागर यांची मातोश्रीवर मनधरणी केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना क्षीरसागर म्हणाले होते की, पुढच्या पाच वर्षांतही हीच आघाडी सत्तेत राहणार आहे. एकही शिवसैनिक भाजपला मतदान करणार नाही. भाजपकडून शिवसेनेच्या डोक्यावर पाय देण्याचे काम सुरू आहे. तुम्हाला राज्यात मोठं केलं त्याच हिंदुत्ववादी पक्षाच्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवत आहात. शिवसैनिक हे कदापि विसरणार नाहीत. या निवडणुकीत शिवसैनिक मोठ्या ताकदीनं, मोठ्या जिद्दीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकदीनं उतरून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील.