अंबाबाईच्या भाविकांच्या सेवेचे आशीर्वाद मिळतील : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; हत्तीमहाल रस्त्याच्या ३५ लाखांचा कामाचा प्रारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी :
करवीर निवासिनी श्री अंबाबाईदेवी मंदिरापासून बिंदू चौकाकडे जाणारा हत्तीमहाल रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या कामाच्या पूर्तीमुळे अंबाबाई देवीच्या भाविकांचे आशीर्वाद मिळतील, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या रस्त्याच्या कामासाठी ३५ लाख रुपयांचा निधी लावण्याचे भाग्य मला मिळाले, असेही ते म्हणाले. श्री. महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा अद्याप मंजूर करता आला नाही, अशी प्रांजळ कबुली देतानाच लवकरच हा ५०० कोटींचा आराखडा मंजूर करू, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर शहरातील श्री.महालक्ष्मी मंदिर प्रभागातील हत्तीमहाल रस्त्याच्या खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण अशा ३५ लाख खर्चाच्या कामाचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर सौ.हसीना बाबू फरास होत्या.
भाषणात मंत्री श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, मी व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींचा निधी आजपर्यंत कोल्हापूर शहराला मिळवून दिला आहे. विकासाच्या नकाशावर कोल्हापूर नेहमीच अग्रेसर व्हावे, या भावनेतून आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. कोल्हापूर ही करवीर निवासिनी, आई श्री. अंबाबाईच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी आहे. तसेच राजर्षी शाहू महाराजांची ऐतिहासिक भूमी आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि दर्शनासाठी लाखों भाविक या शहरात येत असतात. परंतु; यापूर्वी ज्या पद्धतीने या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता. त्या पद्धतीने तो झालेला नव्हता. म्हणूनच मी आणि विनय कोरे यांनी भूमिका घेतली आणि महापालिकेत सत्ता स्थापन केली.
श्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याची राजधानी असलेल्या या शहराची सगळ्यात मोठी अडचण होती. ती स्वच्छ शुद्ध व मुबलक पिण्याच्या पाणी पुरवठ्याची कारण पंचगंगा नाही. दूषित नदी झाल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळा पर्याय शोधणे गरजेचे होते. त्यामुळेच मी आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरासाठी पाचशे कोटींची थेट पाईपलाईन योजना मार्गी लावली ती लवकरच सुरू होईल.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषण स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास म्हणाले, श्री.अंबाबाई मंदिर ते बिंदू चौक जाणारा हा हत्ती महाल रोड भाविक भक्तांच्या ये-जा करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मागील पाच वर्षात भाजप सरकारने कोल्हापूर शहरासाठी एक दमडीही दिली नाही. त्यामुळे भाविकांच्या दर्शनासाठी ये-जा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा रस्ता अक्षरशः उध्वस्त झाला आहे.
भाषणात माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, मंत्री श्री मुश्रीफ यांचा ताफा मी बिंदू चौकातच अडविला. मंत्री श्री मुश्रीफ यांनीही गाडीतून उतरून आमचे मागणे ऐकून घेतले. ओबीसी आरक्षणा नंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी आमची मागणी होती. मंत्री श्री मुश्रीफ यांनी ही ओबीसी आरक्षणा विना निवडणुका होणारच नाहीत, असे अभिवचन आम्हांला दिले आहे. ऐवढा मोठ्या मनाचा दिलदार आणि खिलाडू वृत्तीचा नेता आज घडीला शोधूनही सापडत नाही, असे कौतुक ही श्री वळंजू यांनी केले.
यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी महापौर आर.के. पवार, समीर नदाफ यांचीही मनोगते झाली. व्यासपीठावर माजी महापौर नंदकुमार वळंजू, माजी महापौर आर.के.पवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, जयेश ओसवाल, नेत्रदीप सरनोबत, रमेश पवार, परीक्षित पन्हाळकर, प्रकाश कुंभार, नारायण भोसले, विनायक फाळके, सतिश अतिग्रे, शांताराम घोटणे, कादर मलबारी, इस्माईल बागवान, दीपक इंगवले, अशोक अतिग्रे आदी प्रमुख उपस्थित होते.