जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ मोहिमेपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून करण्यात आला. यावेळी उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी सूचना केल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच याठिकाणी उपस्थित बालकांच्या मातांच्या हस्ते फित कापून पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बालकास पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दुर्गादास पांडे, अधिष्ठाता डॉ. दीक्षित, प्रभारी जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. विलास देखमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्या हस्तेही बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्यात पोलिओ मोहिमेंतर्गत 57 सत्रे राबविण्यात आली आहेत. जिल्ह्यात पोलिओचा शेवटचा रुग्ण 23 ऑगस्ट 1999 मध्ये शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावात आढळला होता. सलग तीन वर्षे पोलिओ रुग्ण न आढळल्यामुळे मार्च 2014 मध्ये भारताला पोलिओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात असणाऱ्या वीटभट्ट्या, कामगार यांची माहिती घेऊन जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांसोबत ऊसतोड, वीटभट्टीवर काम करणारे तसेच स्थलांतरित कामगारांची बालके लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. लसीकरण बूथ बरोबरच गृहभेटीद्वारेही बालकांना डोस देण्यात येणार असून आपल्या परिसरातील प्रत्येक बालकाला डोस मिळाल्याची खात्री सर्वांनी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्यासह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) मधील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
पल्स पोलिओ मोहिम नियोजन-
जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 च्या सर्वेक्षित लोकसंख्या विचारात घेवून पल्स पोलिओ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. ग्रामीण भागात 0 ते 5 वयोटागतील 2 लाख 14 हजार 7 बालके आहे. 1 हजार 699 लसीकरण केंद्रे निश्चित केली असून 4 हजार 434 कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.नगरपालिका क्षेत्रामध्ये 45 हजार 948 बालके आहे. 228 लसीकरण केंद्र निश्चित केली असून 644 कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 47 हजार 490 बालके आहेत. 442 लसीकरण केंद्रे असून 970 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. असे एकूण जिल्ह्यात 3 लाख 07 हजार 445 बालके आहेत. 2 हजार 369 लसीकरण केंद्रे निश्चित केली असून 6 हजार 48 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
घरभेटी कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागामध्ये 6 लाख 48 हजार 709 घरांची संख्या असून 2 हजार 681 टीम तयार करण्यात आली आहे. 540 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपालिका क्षेत्रामध्ये 1 लाख 10 हजार 982 घरांची संख्या असून 166 टीम तयार करण्यात आली आहे. 34 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 लाख 71 हजार 491 घरांची संख्या असून 245 टीम तयार करण्यात आल्या आहेत. 51 पर्यवेक्षकांची निुयक्ती करण्यात आली आहे. ट्रान्झिट टीम 363 तर मोबाईल टीम 654 तयार करण्यात आल्या असून आहेत.