सत्तारूढ नेत्यांना योग्यवेळी किंमत मोजावी लागेल; आमदार विनय कोरेंचा हल्लाबोल
आमदार कोरे यांचा इशारा अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनाच असल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या विकासाचे केंद्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्वांनी राजकारण विसरून एकत्र यावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आमच्या अपेक्षेचा विश्वासघात केला, त्यामुळेच सत्ताधाऱ्यांना तीन जागांचा फटका बसला. सत्ताधारी आघाडीचे सर्व नेते प्रामाणिक असते तर विरोधी पक्षाची एकही जागा निवडून आली नसती. जे पाप ज्यांच्या हातून घडले आहे, त्याला त्याची किंमत योग्यवेळी मोजावी लागेल, असा इशारा जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी दिला.
दरम्यान, आमदार कोरे यांचा इशारा अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनाच असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निकालानंतर कोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला.
कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक सत्ताधारी आघाडीकडून आमदार कोरे यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे सर्जेराव पाटील (पेरीडकर) यांनी लढवली होती. यात सर्जेराव पाटील यांचा पराभव झाला. सत्तारूढ पक्षाचे तीन उमेदवार पराभूत झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सर्व जागा सत्तारूढ आघाडीला मिळतील, अशी आमची अपेक्षा होती. महिला, ओबीसी आणि मागासवर्गीय या जागांवर दोन हजार मतांनी सत्तारुढ गटांचे उमेदवार निवडून आले आहेत. दुर्देवाने प्रक्रिया आणि पतसंस्था गटातून धक्कादायक निकाल आला आहे, असे आमदार कोरे म्हणाले आहे.
“आम्ही जिल्ह्याची आघाडी तालुक्याशी जोडली नाही, त्यामुळे तालुक्यात मारामारी होणार होती. माझे सहकारी सर्जेराव पाटील हरले पण ते फारसे धक्कादायक नव्हते. मात्र, जिल्ह्यातील नेत्यांच्या विश्वासघातामुळे सत्तारूढ आघाडीच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला. प्रत्येकाला विकासापेक्षा राजकारणातील गट-तट, मोठेपणा याला महत्त्व दिल्याचे लक्षात आले आहे. ज्यांनी पाप केले आहे, त्यांना त्याची किंमत योग्यवेळी चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी आघाडीच्या नेत्यांना दिला.”