शाहू साखर कारखान्यामार्फत आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मल्लांचा सहभाग; प्रशासनाने परवानगी दिली तर मातीतील कुस्तीचे आयोजन करण्यास इच्छुक : चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी :
येथील शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बाल गटात उच्चांकी २७६ मल्लांनी सहभाग नोंदविला. शाहू जयंती निमित्त घेण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. यावेळी डबल महाराष्ट्र केसरी कारखाना मानधनधारक मल्ल चंद्रहार पाटील, शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये गेली दोन वर्षे कुस्ती स्पर्धा बंद आहेत. मात्र शाहू साखर कारखान्याने या वेळी विना प्रेक्षक कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेचे कुस्ती शौकिनांसाठी घरबसल्या पाहता येण्यासाठी ऑनलाईन प्रक्षेपण केले जात आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बाल गटातील चटकदार कुस्त्या झाल्या.उद्या मंगळवारी (ता.५)कुमार गटातील तर बुधवारी(ता.६) ज्युनियर व महिला गटातील कुस्त्या होणार आहेत.
सुरवातीस कागलच्या शाहू उद्यानातून खेळाडूंनी क्रीडा ज्योत कार्यस्थळापर्यंत आणली. त्याचे पूजन राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील यांनी केले.
यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे व क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमेचे पूजनही श्री. घाटगे यांनी केले. खेळाडूंनी मानवंदना दिली. तसेच क्रीडा शपथही घेतली. स्वागत व प्रास्ताविक संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांनी केले.