न्याय आपल्या दारी संकल्पनेअंतर्गत प्राधिकरणाद्वारे संकेतस्थळाची निर्मिती

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार समाजातील प्रत्येक व्यक्तींना ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेअंतर्गत मोफत विधी सहाय्य मिळावे आणि तळागाळातील व्यक्ती न्यायापासून वंचित राहू नयेत याकरिता nalsa.gov.in या वेबसाईटवरून केव्हाही आणि कोणत्याही ठिकाणावरुन आपले प्रश्न अथवा व्यथा मांडण्याची सोय प्राधिकरणाद्वारे करण्यात आली आहे.
१ जानेवारी ते १३ डिसेंबर पर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयात एकूण १७२ लोकांनी मोफत वकील मागणी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १७२ लोकांना त्यांची वर्गवारी उदाहरणार्थ महिला अर्जदार, एस.सी., एस.टी, जातीचा प्रवर्ग आणि ज्येष्ठ नागरिक तथा तीन लाखाच्या आत उत्पन्न असणारे सर्वसामान्य वर्गातून आणि जेलमधील बंदी ज्यांना खासगी वकील देणे परवडणारे नसते अशा सर्व घटकातील लोकांना मोफत वकील पुरविण्यात आले आहेत.
नालसा पोर्टलवर संबंधित व्यक्तीस कोणते वकील नेमण्यात आले, याची माहिती भरण्यात आलेली असते. तसेच दिलेल्या वकीलांचा अथवा विधी स्वयंसेवकांची यादी देखील नालसा पोर्टलवरून दिसून येते. वकील अथवा विधी स्वयंसेवकांची कार्यालयातील मुदत किती काळापर्यंत मर्यादीत आहे हे देखील पोर्टलवरून समजते व त्यामध्ये पुन्हा मुदतवाढ करता येते.
न्यायालयात प्रकरण प्रलंबित असणारा व्यक्ती नालसा पोर्टलवर अर्ज करु शकतो. तसेच आपले वैयक्तिक प्रश्न अथवा आपल्या व्यथा मांडण्यासाठी आणि मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज करु शकतो. त्यासाठी ज्याठिकाणी अर्ज पाठवावयाचा आहे त्या ठिकाणी संबंधित कार्यालय त्या त्या ठिकाणी अर्ज फॉरवर्ड करु शकते. कायदेविषयक माहिती मिळण्याकरिता प्राधिकरणामार्फत वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी यु –ट्युब वर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मार्गदर्शनपर चित्रफित तयार करण्यात आली आहे. नालसा पोर्टलवर माहिती पाठविण्याकरीता वेगवेगळे पर्यायदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी केले आहे.