डोंगरावरून दुर्बिणीने निरीक्षण करून भारत-इंग्लंड मॅचमधील प्रत्येक बॉलवर लावत होते सट्टा, ३३ जणांना अटक

पुणे प्रतिनिधी :
पिंपरी गहुंजे येथील क्रिकेट बेटिंगच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये महराष्ट्रासह परराज्यातील एकूण ३३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी शनिवारी (दि. २७) पहाटेच्या सुमारास गहुंजे स्टेडियम नजीकच्या मामुर्डी गावात ही कारवाई केली.
पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गहुंजे येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यांचे दुर्बिणीने निरीक्षण करून प्रत्येक बॉलवर ऑनलाईन सट्टा घेत होते. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार तीन टीम तयार करून मामुर्डी गाव, घोरवडेश्वर डोंगर आणि विमाननगर परिसरात छापा मारून ३३ जणांना अटक करण्यात आली
आरोपींकडून ७४ मोबाईल, ३ लॅपटॉप, एक लाख २६ हजार ४३० हजारांची रोकड, २८ हजार रुपये किंमतीची विदेशी चलनातील नाणी, कॅमेरे, दुर्बीण, स्पीकर आणि कार असा ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश येथील आरोपींचा समावेश आहे. यामध्ये आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.