कोल्हापूर : गोकुळची निवडणूक २ मे रोजी

कोल्हापूर प्रतिनिधी :
गोकुळ दूध संघासाठी 2 मे 2021 ला मतदान तर 3 मे रोजी मतमोजणी होईल. 25 मार्चपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. नियोजित निवडणूक कार्यक्रमात अजूनही थोडाफार बदल होण्याची शक्यता असल्याचे असे सुत्रांनी सांगितले. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे येत्या दोन दिवसांत प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. गोकुळ निवडणूक कार्यक्रमास मंजुरी आल्यानंतरच याची अंमलबजावणी होणार आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणुकीची अंतिम मतदार यादी 12 मार्चला प्रसिद्ध केल्यानंतर 22 ते 30 मार्चदरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे कायद्याने बंधन आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत निवडणूक अधिकार्यांकडून प्राधिकरणाकडे कार्यक्रम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम नेमका कसा असणार याबाबत आराखडे बांधले जात आहेत. साधारण आठ दिवसांत अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.