कोल्हापूर : महापालिका कर्मचाऱ्यांना योग्य ऍडव्हान्स द्या; अन्यथा ‘थाळीनाद’

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
महापालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी अगोदर तसलमात रक्कम घेण्याची सोय असते. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी या रक्कमेची कर्मचाऱ्यांना आवश्यकता असते. कायम कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम तसलमात घेता येते असा शासनाचा आदेश आहे. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेने ही रक्कम आठ हजार रुपये एवढी निश्चित केल्याचे समोर आले आहे व ती रक्कम कधीपर्यंत मिळेल याची शाश्वती महापालिकेने दिलेली नाही.
दिवाळी सण साजरा करण्यासाठी लागणारी रक्कम नियमाप्रमाणे पुढील दहा महिन्यात पगारातून वजा करून घेतली जात असताना देखील आठ हजार रुपये एवढीच रक्कम तसलमात घेता येईल असे सांगितले जात आहे. कोरोनाच्या काळात अहोरात्र काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर हा अन्याय आहे. या धोरणाचा विरोध म्हणून आम आदमी पार्टीने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन शासनाच्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना 12 हजार 500 रुपये इतकी रक्कम तसलमात घेण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली.
महापालिकेने योग्य तसलमात रक्कम न दिल्यास कर्मचाऱ्यांच्या फराळाची ताटे रिकामे राहतील याची जाणीव महापालिकेने ठेवावी. तसे झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर ‘थाळीनाद’ आंदोलन करण्यात येईल असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.
यावर डॉ. बलकवडे यांनी जीएसटी ग्रांटची रक्कम जमा झाल्यास याचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले.
येत्या मंगळवार दि. 26 ऑक्टोबर पर्यंत यासंदर्भात बैठक घेऊन योग्य तसलमात रक्कम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही तर महापालिकेच्या दारात थाळीनाद करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.