आंदोलनासाठी गर्दी जमवून करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांविरोधात गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी :
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे.हे पत्र समोर आल्यानंतर भा.ज.पा.ने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यभरामध्ये आंदोलनं केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने सुरू करण्यात आली आहेत.
पुण्यात देखील आंदोलन करण्यात आलं होतं.
मात्र आता या आंदोलनप्रकरणामध्ये करोना कालावधीतील नियम मोडल्याप्रकरणी भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांविरोधात विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शनिवारी सायंकाळी परमबीर सिंग यांचं पत्र समोर आल्यानंतर रविवारी भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकात पुणे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
करोना काळात एका ठिकाणी गर्दी होता कामा नये असा शासन आदेश असतानाही या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये चंद्रकात पाटील यांच्यासहीत ४० ते ५० जणांच्या नावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भा.ज.पा. तर्फे पुणे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
’अनिल देशमुख हे सचिन वाझेंचा सभागृहात बचाव करत होते याच्या मागचं कारण म्हणजे वाझे त्यांच्यासाठी वसुली करत होते’असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.