कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक : संचालकांना पुन्हा एन्ट्रीचे, तर नेत्यांना बिनविरोधचे वेध

कोल्हापूर प्रतिनिधी :
जिल्हा बँक निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी नेत्यांसह इच्छुकांच्या जोडण्या वेगावल्या आहेत. मागील वेळी आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ए. वाय. पाटील बिनविरोध संचालक झाले. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, आ. विनय कोरे आदींनी बिनविरोधच्या दृष्टीने फासे टाकले आहेत. प्रमुख नेत्यांना बिनविरोधाचे, तर विद्यमानांसह इच्छुकांना जिल्हा बँकेत पुन्हा एन्ट्रीचे वेध लागले आहेत.मागील वर्षी चार जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवत शेतकरी शाहू विकास आघाडीने एक हाती सत्ता आणली. राष्ट्रवादी आठ जागा, काँग्रेस सहा, जनसुराज्य आणि अपक्ष प्रत्येकी दोन आणि भाजप-सेना एका जागेवर विजयी झाले होते. अपक्ष माजी आमदार कै. नरसिंग गुरुनाथ पाटील आणि अशोक चराटी यांनी बाजी मारली होती.