केंद्रीय पथकाकडून शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथे महापुरामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी व ग्रामस्थांशी साधला संवाद

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेती पिके, घरे व दुकानांची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
केंद्रीय पथकाने शिरोळ येथील ऊस शेती पिकाची पाहणी केली. येथील शेतकरी गिरीश कवळेकर व कृषी मित्र युसुफ सिकंदर किरणे व अन्य उपस्थित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पथक प्रमुख रेवनिष कुमार यांनी संवाद साधला.
यावेळी अतिवृष्टी व महापुरामुळे शिरोळ भागात नुकसान झालेल्या शेती पिकांची माहिती संबंधित शेतकऱ्यांकडून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे पूर येत असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच वेळेत सानुग्रह अनुदान द्यावे, अशीही त्यांनी मागणी केली. या भागातील सर्व शेती पिके किमान दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली होती व ऊस वरून जरी हिरवा दिसत असला तरी आतून पूर्णपणे नासुन गेला असून त्याला फंगस लागलेला आहे. त्याचा काढणी खर्चही करू शकत नाही, अशी कैफियत शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांसमोर मांडली.
कुरुंदवाड येथील ग्रामस्थ महेश दिवाजी जेवापे यांच्याशी केंद्रीय पाहणी पथकातील सदस्यांनी संवाद साधला. यावेळी श्री जेवापे यांनी महापुरात त्यांचे घर व जनावरांच्या गोठ्यातील 2 म्हशी वाहून गेल्याची माहिती दिली. तसेच बचाव पथकाने कुटुंबातील सदस्यांना बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी वेळीच हलविले, असे त्यांनी सांगितले. तर नृसिंहवाडी मध्ये महापुरामुळे दुकानांमध्ये पाणी जाऊन विविध दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती व्यापारी संघटनेने केंद्रीय पथकाची भेट घेऊन दिली. तसेच झालेल्या नुकसानीचे सानुग्रह अनुदान मिळेल परंतु नियमित येणाऱ्या पुरावर वेळीच उपाययोजना कराव्यात. अलमट्टी धरणाचा विसर्ग वेळेत सोडल्यास या भागात बॅक वॉटर येणार नाही व पूर परिस्थिती कमी होईल. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील व्यापारी, शेतकरी व ग्रामस्थांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेतकऱ्यांचे, दुकानदारांचे व घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून केंद्र शासनाकडून मदत मिळाल्यास त्यांना त्याचे वितरण करता येईल, असे सांगितले.
या केंद्रीय पथकाचे प्रमुख वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनीष कुमार, तर सदस्य नागपूर येथील जलशक्ती चे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक श्रीमती पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, सनदी अधिकारी प्रताप जाधव यांचा समावेश आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रमुख पथकासोबत उपस्थित होते.