गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई ऑनलाईन :
महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन-सचिन वाझे प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनीच केल्याचा आरोप हिरेन यांच्या पत्नीने केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची आणि निलंबनाची मागणी केली होती. भाजप नेत्यांनी त्यांच्या या मागणीला पाठिंबा देत सचिन वाझेंवर कारवाईची मागणी केली होती. पण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली केली जाईल असं सांगितलं. अखेर एनआयएच्या तपासात सचिन वाझेंवर काही आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अटक करून निलंबित केले. अशा परिस्थितीत, ‘सचिन वाझेंना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.
भाजप नेते प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओसोबत त्यांनी एक कॅप्शनदेखील लिहिलं. “सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावे बाहेर येतायत किंवा येतील आणि यातून झालेली मुंबई पोलिसांची नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा!”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, “रोज या प्रकरणात होणारे नवीन खुलासे फारच धक्कादायक आहेत. स्कॉर्पियो कारचं प्रकरण, इनोव्हा कारचं प्रकरण या गोष्टींचा विचार करता बड्या अधिकाऱ्यांची नावे समोर येताना दिसत आहेत. असं समजतंय की या प्रकरणात दोन डीसीपी पदाचे अधिकारीदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नाही”, असंही लाड म्हणाले.
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री जर एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पाठीशी घालत असेल तर ही खूपच खेदजनक बाब आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनाम घेतला गेलाच पाहिजे. किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.