राज्य सरकारची घोषणा ! MPSC परीक्षा 21 मार्चला होणार; आंदोलनाला मोठं यश

मुंबई :
राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. या निर्णयानंतर पुण्यात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. विरोधी पक्ष आणि सरकारमधील मित्र पक्षांनी सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शुक्रवारी (दि.12) परीक्षेची तारीख जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते.
राज्य सरकारने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक इत्यादी शहरांतील परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. अखेर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत परीक्षेची तारीख आज जाहीर करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून, 21 मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, फेसबुक लाइव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. MPSC ची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भीती आहे. अशा विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. कारण परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे.