कोगनोळीत रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण; खराब रस्त्यांना त्रासलेल्या नागरिकांचा उपक्रम

कोगनोळी :
कोगनोळी येथील आंबेडकर नगर पासून हंचिनाळ पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन शुक्रवारी नागरिकांनी केले. यावेळी लवकरात लवकर रस्ता करण्यात यावा अन्यथा उपोषणाचे हत्यार उपसले जाईल असा इशाराही देण्यात आला.
कोगनोळी पासून हंचिनाळ पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना शालेय विद्यार्थी, औद्योगिक वसाहतीचे कर्मचारी तारेवरची कसरत करतात. या खड्ड्यांमुळे काहींना अपघातांनाही सामोरे जावे लागले आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यावरील रहदारीमुळे हे पाणी रस्त्याशेजारील घरांमध्ये उडते. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या गोष्टींना त्रासलेल्या नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले व यामध्ये सुधारणा न झाल्यास उपोषणाचे हत्यार उपसण्याचाही इशारा दिला.
रस्त्यापूर्वी गटारींची दुरुस्ती आवश्यक
रस्त्याशेजारी असणाऱ्या गटारीवर नागरिकांनी स्लॅब टाकून घेतलेला आहे. या स्लॅबखाली असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपना कचरा अडकल्याने गटारी तुडुंब भरतात. हा स्लॅबखालील कचरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना स्वच्छ करता न आल्याने गटारी तुंबतात व त्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने पुन्हा रस्ते खराब होतात. त्यामुळे या गटारींची सर्वप्रथम स्वच्छता करणे आवश्यक आहे. अन्यथा परत रस्त्यावर खड्डे पडण्यास वेळ लागणार नाही.
कोगनोळीतील आंबेडकर नगर पासून हंचिनाळ पर्यंतच्या रस्त्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील काही दिवसात त्याला मान्यता मिळेल. पावसाळा संपताच हा पूर्ण रस्ता नवीन करण्यात येणार आहे.
बी. बी. बेडकीहाळे, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग