कुपलेवाडी रस्ता रखडल्याने बनला मृत्युचा सापळा; मुख्यमंत्री सडक योजनेतील काम, दोन वर्ष ग्रामस्थांची पायपीट, अधिकारी – ठेकेदाराचे दुर्लक्ष.

धामोड प्रतिनिधी : प्रतिष पाटील
कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी (ता.राधानगरी) गावासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरु असलेल्या रस्त्याचे काम ठेकेदार व अधिकारी यांच्या मनमानीमुळे गेल्या दोन वर्षापासून रखडले आहे.परिणामी सध्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाल्याने रस्ता मृत्युचा सापळा बनला आहे.तर दूध वाहतूकीसह सर्व वाहतूक बंद पडल्याने ग्रामस्थांना चिखलातून पायपीट करत प्रवास करावा लागत आहे.
कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी गाव डोंगरालगत असून गेल्या ७० वर्षा पासून पक्या रस्त्या अभावी ग्रामस्थांना वंचित राहावे लागले होते.परिणामी पावसाळ्यात तर येथील वृद्ध स्त्री-पुरुष शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना गुडघ्या भर चिखलातून प्रवास करावा लागत होता.तसेच वाहतूक बंद पडल्यामुळे येथील दुग्ध व्यवसाय पण अडचणीत येत होता. त्यामुळे कुपलेवाडीला दुर्गम बेटाचे स्वरुप प्राप्त होत होते.
मात्र रस्त्या अभावी कुपलेवाडी ग्रामस्थांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विशेष लक्ष दिले. व त्यांनी विशेष प्रयत्न करुन कोनोली – कुपलेवाडी ते पखालेवाडी या रस्त्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री सडक योजनेतून सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
सदर रस्त्याचे काम गतवर्षापासून श्रीनिवास कन्ट्रक्शन या ठेकेदार कंपनी कडून करण्यात येत आहे. यामध्ये रस्त्याचे काही प्रमाणात रुंदीकरण केल्या नंतर ठेकेदाराने कुपलेवाडी गावातंर्गत रस्त्यात्याबाबत समस्या निर्माण झाल्याचे कारण पुढे करत काम बंद केले होते. त्यामुळे गतवर्षीच्या पावसाळ्यात ही येथील ग्रामस्थांना गैर सोयीचा सामना करावा लागला होता.
मात्र पावसाळा संपल्यानंतर काम सुरु होऊन रस्ता पूर्ण होईल अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा होती.मात्र मुख्यमंत्री सडक योजनेतील अधिकारी व ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे सदर काम सुरु करण्यास पावसाळ्या अगोदर काही दिवस मे महिन्याच्या मुहूर्ता वर सुरुवात केली. यात ठेकेदाराने खडी मधील जीएसबीचे निम्मे काम करण्यात समाधान मानले आहे.
तसेच पावसाच्या तोंडावर माती टाकून साईट पट्टयाचे काम केले आहे.परिणामी सध्या मुख्य रस्तावर मातीमुळे प्रचंड दलदल निर्माण झाली असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.तर गटर्स अभावी अनेक ठिकाणी रस्त्यात्यावरील माती व डोंगरातील पाणी वाहत जाऊन लगतच्या शेतीचे ही नुकसान झाल्याने संताप व्यक्त होत आहे. या सर्व प्रकाराला संबंधित अधिकारी व ठेकेदार कंपनी जबाबदार असल्याचे मत जनतेतून व्यक्त होत आहे.
सध्या चिखलामुळे कुपलेवाडी येथील दूध वाहतूकीसह सर्व प्रकारची वाहतूक बंद पडल्याने ग्रामस्थांना गुडघाभर चिखलातून पायपीट करत प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव आहे. तर दुध संस्थांचे दूधाने भरलेले कॅन सांगड करून पायपीट करत खांद्यावरुन पखालेवाडी पर्यत वाहून आणावे लागत आहे.चिखलामुळे रस्ता निसरडा बनल्याने येथील प्रवास जीवघेणा ठरत आहे.तरी मुुख्यमंत्री सडक योजनेच्या अधिकाऱ्यानीं वेळीच लक्ष देऊन चिखल हटविण्यासाठी प्रयत्नकरावेत अशी मागणी जनतेतू होत होत आहे.
पाहणी करुन निर्णय घेऊ..!
सदर रस्त्याच्या कामात प्रथम गावपातळीवर अडथळे आल्याने गतवर्षी काम पूर्ण होऊ शकले नाही. तर चालू वर्षी निधीचा अभाव असल्याने कामात अडथळा आला आहे. तरी पण जीएसबी मध्ये खडी करण केले आहे. तरी ही सदर रस्ता वाहतूकीस योग्य नसेल तर पाहणी करुन निर्णय घेऊ.
– एस.ए.गायकवाड,
उपअभियंता, राधानगरी विभाग,कोल्हापूर.