शालेय फीमध्ये 50% सवलत द्या : ‘आप’ची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
मागील सोमवारपासून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने तास घेतले जात आहेत. परंतु मागील वर्षाची फी भरली नसल्याने ऑनलाइन वर्गात विद्यार्थ्यांना लिंक न पाठवून त्यांना वर्गात बसू न देण्याची प्रकरणे समोर आली आहेत. शालेय फी चा तगादा लावून पालकांना वेठीस धरले जात आहे. वीजबिल, देखभाल यासारखे शाळेचे इतर खर्च कमी झाले असून देखील फी कमी केली जात नसल्याचे समोर आले आहे. शाळेच्या फी मध्ये 50% सवलत द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना देण्यात आले.
सर्व शाळांनी आपल्या मागील वर्षीच्या खर्चाचे ऑडिट करून अतिरिक्त जमा रकमेचा परतावा पालकांना करावा असे आदेश शिक्षण विभागाने द्यावेत, शालेय वर्षाचा कार्यकाळ व अभ्यासक्रम ठरल्यानंतरच पालक शिक्षक कार्यकारी समिती तयार करून त्यांची मान्यता घेतल्यावरच नवीन शालेय वर्षाची फी आकारावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढणे, पालकांना फी भरण्यास मुदतवाढ न देता मानसिक त्रास देणे असे प्रकार शाळांनी करू नयेत यासाठी शिक्षणाधिकार्यांनी सक्त सूचना द्याव्यात अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिला.
यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, ऍड. किरणसिंह शिलेदार, पालक प्रतिनिधी सचिन डाफळे, दिलीप पाटील, विशाल वठारे, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.