अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ लाभार्थ्यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर मांडल्या व्यथा शासन स्तरावर आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी घातले साकडे

कागल,प्रतिनिधी.
मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत मराठा समाजातील नवउद्योजक लाभार्थ्यांच्या व्याज परताव्यामध्ये अनियमितता आहे. राज्य सरकार या योजने अंतर्गत मराठा समाजाला दिलासा देण्यासाठीच्या उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत नाही असे दिसत आहे. ही मराठा समाजातील तरुणांची शुद्ध फसवणूक आहे.यामध्ये लक्ष घालून मराठा तरूणांना दिलासा द्या.असे साकडे शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांना निवेदनाद्वारे केले.
यावेळी तरूणांनी त्यांच्या व्यथा श्री. घाटगे यांच्यासमोर मांडल्या व आमच्या न्याय मागणी साठी शासन स्तरावर आवाज उठवावा,अशी विनंती केली.
यावेळी शिरोळ तालुक्यातील निलेश पगडे म्हणाले, मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर राज्य शासनाकडून पूर्वी पंधरा दिवसात मिळणारा व्याज परतावा आता दोन महिन्यांपासून मिळालेला नाही. कोरोनाच्या नावाखाली या मुदतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मराठा समाजातील प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या तरुणांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत या तरुणांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले आहेत.परंतु यापुढे ते आम्हाला नियमितपणे भरणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे आमचे व्यवसाय अडचणीत येऊन कर्ज दिलेल्या बँकांही अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे तरुण दोन्ही बाजूंनी आर्थिक अडचणीत येणार आहेत . त्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी राजे आता आपणच पुढाकार घ्यावा.व आम्हाला दिलासा मिळवून द्या.असे साकडे घातले.
अर्बन बँकेचे व राज्य बँक असोसिएशनचे संचालक शिरीष कनेरकर म्हणाले, बँक असोसिएशनच्या माध्यमातून पाटील महामंडळाच्या मराठा समाजातील लाभार्थी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी बँक पातळीवर एकत्र येण्यासाठी पुढाकार घेऊ. या योजनेत वित्तपुरवठ्यात राज्यात अग्रेसर असलेल्या राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे मार्गदर्शक समरजितसिंह घाटगे यांनी समाजातील तरुणांसह बँकांच्याही पाठीशी उभे राहावे.
यावेळी ओंकार अस्वले या तरुणाने सुद्धा संतप्त भावना व्यक्त केल्या
श्री. घाटगे म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नियोजन मंडळामध्ये विलीनीकरण केले आहे.मात्र त्यासाठी कोणत्याही वेगळ्या निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे व्याज परताव्यात अनियमितता निर्माण झाली आहे. मराठा समाजातील तरुणांसह त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्या बँका अडचणीत येऊ शकतात.हे या नवउद्योजक तरूणांचे म्हणणे खरे आहे.त्यासाठी राज्य शासनाने हा विषय गांभीर्याने घ्यावा. . त्यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.वेळेत व्याज परताव्यासह मुद्दलाचा पहिला हप्ता काही तरुणांना मिळालेला नाही. तो त्वरित द्यावा. यासाठी मराठा समाजातील तरुणांसह या तरुणांना वित्त पुरवठा करणाऱ्या बँकांना एकत्र करण्याचे काम बँक असोसिएशनने करावे. अशा तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवावा.मी त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरण्यास सुद्धा तयार आहे.
यावेळी अर्बन बँकेचे संचालक जयसिंगराव माने, राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, नगरसेवक विशाल पाटील ,प्रताप पाटील यांच्यासह आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.